श्री संत लहानुजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांनी लोकल18 शी तेथील उपक्रमाबाबत चर्चा केली. तेव्हा ते सांगतात की, आमच्या या संस्थेत तीन महत्त्वाच्या योजना चालतात: शाश्वत अन्नदान योजना, गोसेवा योजना, गुरुदक्षिणा योजना. या तिन्ही योजना मिळून होणारी रक्कम आम्ही खर्च करीत नाही. ती बँकमध्ये फिक्स असते. त्यावरील व्याज घेऊन आम्ही सर्व संस्थेचा खर्च भागवितो.
advertisement
शाश्वत अन्नदान योजना
पुढे ते सांगतात की, आमच्याकडील सर्वात पहिली योजना आहे, ती म्हणजे शाश्वत अन्नदान योजना. या योजनेच्या माध्यमातून आम्ही संस्थेतील सर्व लोकांना आणि संस्थेत भेटी देणाऱ्या सर्वांना अन्नदान करतो. दररोज 250 ते 300 लोकं आमच्या संस्थेत जेवण करतात. ही अन्नदान योजना आम्ही लोकवर्गणीतून चालवतो. ज्याला कोणाला अन्नदान करायचे असेल त्यांनी 1001 रुपयाची पावती देऊन आमच्या इथे अन्नदान करू शकतात. ही पावती एकदाच द्यायची आहे. त्यानंतर संपूर्ण आयुष्यभर त्या व्यक्तीच्या नावाने आम्ही अन्नदान सुरू ठेवतो, अशी ही आमची शाश्वत अन्नदान योजना आहे, असे त्यांनी सांगितले.
गोसेवा योजना
संत लहानुजी महाराज हे वर्धा नदीच्या काठी गाई चारत होते. त्यांनी अनेक वर्ष गोसेवा केली. त्यांच्या प्रेरणेतून आम्ही गोसेवा सुरू केली. आमच्या गोरक्षणमध्ये सध्या 450 गाई आहेत. त्यांचा सांभाळ आम्ही करतो आहे. अनेक लोक आमच्या गोरक्षणात गाई आणून सोडतात. सध्या आमच्याकडे 480 गाई आहेत. मग, या गाईंचा चारा, पाणी, औषध हा खर्च कसा करायचा? तर यासाठी ही गोसेवा योजना आहे. त्यात 1101 रुपयाची पावती देतात. गाई संख्येने जास्त आहेत, त्यामुळे त्यांच्या मल-मूत्राचा वापर डायरेक्ट शेतात करणे शक्य नव्हते. इतके खत आम्ही शेतात वापरले असते तरीही ते उरेल इतके होते. म्हणून आम्ही हा गोबरगॅस प्लांट सुरू केला, असे ते सांगतात.
होतकरू मुलांसाठी मोफत अभ्यासिका
आमच्या संस्थेतील शैक्षणिक उपक्रम म्हणजे लहानु अभ्यासिका आणि मार्गदर्शन केंद्र. ही अभ्यासिका कोरोना काळात होतकरू विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली. या अभ्यासिकेत प्रवेश घेण्याकरिता विद्यार्थ्यांना कुठलीही फी लागत नाही. त्यांना सर्व सुविधा संस्थानमार्फत दिल्या जातात. या अभ्यासिकेतून आतापर्यंत जवळपास 29 विद्यार्थी शासकीय सेवेत रुजू झाले आहेत. त्या सर्व मुलांना मोफत राहण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आणि आरोग्य तपासणी सुद्धा दिली जात आहे, असेही त्यांनी सांगितले.
10 रुपयांत आरोग्य सुविधा
आमच्या संस्थेतील सर्व लोकांना आम्ही फक्त 10 रुपयांत आरोग्य तपासणी आणि औषध उपलब्ध करून देतो. निराधार लोकांची संख्या 26 आहे. तसेच शैक्षणिक उपक्रमातील मुलं 40 आहेत. त्या सर्वांना फक्त 10 रुपयांत आरोग्य सुविधा देण्यात येते. गावातील 2 डॉक्टर याठिकाणी येतात. आठवडाभर आळीपाळीने येऊन ते संस्थेतील सर्वांना सुविधा देतात.
असेच आणखी बरेच उपक्रम आम्ही राबवितो. शेतीविषयक अनेक उपक्रम आहेत. सेंद्रिय शेती, गांडूळ खत, शेण खत, गोमूत्र अर्क यासारखे अनेक शेती उपयोगी प्रॉडक्ट आमच्याकडे तयार केले जातात. अशी आमची संस्था काम करते, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक बाळासाहेब पावडे यांनी दिली.