विद्यार्थ्यांना शिकवण्याचा ध्यास
राजेंद्र मिरापूरकर हे वर्धा जिल्ह्यातील झडशी येथील शाळेत मुख्याध्यापक पदावर कार्यरत होते. विद्यार्थ्यांवर त्यांचा चांगलाच वचक होता. सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले शिक्षण कार्य थांबवले नाही. कोणत्याही परिस्थितीत आयुष्यभर विद्यार्थ्यांना निशुल्क शिकवण्याचा ध्यास त्यांनी घेतला. प्रसिद्धीपासून कोसो दूर असलेले मिरापूरकर गुरुजी वर्धा जिल्ह्यातील ग्रामीण भागात जातात. तेथील 5 वी ते 10 वी च्या विद्यार्थ्यांना गणित हा विषय शिकवतात. 'शिक्षकांनी शाळेतच विद्यार्थ्यांना चांगलं शिकवलं तर वेगळ्या शिकवणीची गरज पडणार नाही, असा उद्देश असल्याचं ते सांगतात.
advertisement
YouTube वरुन शिक्षण, कीर्तनातून जागृती! प्रयोगशील शिक्षिकेचा सरकारकडून सन्मान
उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्येही चालले वर्ग
विशेष म्हणजे उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये देखील हे गुरुजी अतिरिक्त तासिका घेऊन विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी तयार करत आहेत. अनेकांना गणित हा विषय कठीण वाटतो. मात्र मिरापूरकर गुरुजी विद्यार्थ्यांना कठीण विषय सोप्पा करून देत आहेत. जोपर्यंत विद्यार्थ्यांना समजत नाही तोपर्यंत ते पिछा सोडत नाहीत. आता विद्यार्थ्यांना गणितात रुची निर्माण झाली असून विद्यार्थीही गणिताचा क्लास चुकवत नाहीत.
अध्यापन कार्यात जपणार सातत्य
रविवार असो, सणांची सुट्टी असो किंवा उन्हाळ्याच्या सुट्ट्या असो मिरापूरकर सरांचा गणिताचा अतिरिक्त वर्ग असतोच. त्यामुळे बाराही महिने गणिताचा वर्ग घेणारे शिक्षक म्हणून त्यांनी शैक्षणिक क्षेत्रात नावलौकीक मिळविलेला आहे. एका शिक्षकाला एक तासिका घेणे कठीण जाते. परंतु मिरापूरकर गुरुजी एकाच तासिकेत दोन तर कधी कधी तीन तीन वर्ग घेतात. मिरापूरकर गुरुजींना गणित विषयासह इतरही शैक्षणिक उपक्रमात रस आहे.
Video: शाळेच्या भिंतीही लागल्या बोलू.., कोरोना काळातील अनोख्या कामासाठी शिक्षकाला मोठं बक्षीस
ग्रामीण पालक समाधानी
मिरापूरकर गुरुजींच्या गणित शिकवण्यामुळे विद्यार्थ्यांनाही गणित विषयात रुची निर्माण होऊ लागली आहे. सुट्टीच्या दिवशी असलेला गणिताचा वर्ग संपल्यानंतर गावात तसेच परगावात जाऊन पालक संपर्क वाढविला आहे. त्यामुळे बाहेरगावी नामवंत शाळेत असलेल्या विद्यार्थ्यांनी मिरापूरकर गुरुजींच्या शाळेत प्रवेश घेतला आहे.
सामाजिक संस्थेकडून सत्कार
खरंतर कोणत्याही सत्कारासाठी मिरापूरकर सरांनी प्रयत्न केले नाहीत. प्रसिद्धीचीही त्यांना आवड नाही. मात्र त्यांच्या कार्याची दखल घेऊन एका संस्थेने वर्ध्यात त्यांचा सत्कार केला. फक्त निस्वार्थपणे विद्यार्थ्यांना शिकवत राहावं हा उद्देश ते साध्य करत आहेत. गणित विषयात ध्येयवेडे असलेले हे शिक्षक सप्टेंबर 2020 मध्ये सेवानिवृत्त झाले खरे मात्र आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत विद्यार्थी घडवण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. गणित विषयात विद्यार्थ्याने प्राविण्य मिळवावे या हेतूने कार्य करत असलेल्या मिरापूरकर गुरुजींचे कार्य खरोखरच प्रेरणादायी ठरतेय.