Video: शाळेच्या भिंतीही लागल्या बोलू.., कोरोना काळातील अनोख्या कामासाठी शिक्षकाला मोठं बक्षीस
- Published by:News18 Marathi
Last Updated:
जिल्हा परिषद शिक्षक महेश गाडे यांच्या अनोख्या उपक्रमाची राज्यभर चर्चा झाली. आता राज्य सरकारनंही गौरव केला.
बीड, 3 सप्टेंबर: राष्ट्र उभारणी आणि पुढील पिढी घडवण्यात शिक्षकांचा वाटा खूप मोठा असतो. कोविड काळातही शिक्षकांनी मोठ्या जिद्दीने आणि हिमतीने विद्यार्थी शिक्षणाच्या प्रवाहातून बाहेर जाऊ नये यासाठी प्रयत्न केले. बीड जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेमध्ये कार्यरत असणाऱ्या शिक्षकाने कोविड काळामध्ये उल्लेखनीय कार्य केलं. या कार्यामुळेच आता शिक्षक महेश गाडे यांना क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झालाय.
राज्य शिक्षक पुरस्काराने गौरव
शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान आणि गौरव व्हावा यासाठी राज्य सरकारच्या वतीने विविध पुरस्कार दिले जातात. बीड जिल्ह्यातील ताडसोन्ना या गावातील जिल्हा परिषद शाळेमधील शिक्षक महेश गाडे यांना नुकताच क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्यशिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर झाला. कोविड काळामध्ये शिक्षण कार्य अबाधित ठेवताना BALA -building as learning aid हा नवोपक्रम राबविला. त्यांच्या या कार्याची दखल घेत राज्य सरकारने त्यांचा गौरव केला आहे.
advertisement
काय आहे बाला उपक्रम?
कोविड लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये शिक्षक शाळेत जात होते. पण विद्यार्थी शाळेमध्ये येत नव्हते. ही परिस्थिती असताना मी व माझे सहकारी शिक्षक गोडबोले सर व शेळके सर यांना सोबत घेऊन बाला उपक्रमाचे आयोजन केले. या उपक्रमांतर्गत आम्ही सर्वांनी स्वखर्चाने स्वतः हातात पेंट ब्रश घेऊन शाळेच्या सर्व भिंती कोपरे व शाळेचे सर्वच भाग या ठिकाणी शैक्षणिक साधनांची निर्मिती केली. यामध्ये सर्वच विषयाचे शैक्षणिक साहित्य भिंतीवर स्वतः पेंट करून शाळेच्या भिंती बोलक्या केल्या. यामुळे विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असणाऱ्या सर्व संकल्पना नकळत विद्यार्थी वाचू लागले व त्या सर्व संकल्पना त्यांना सहजपणे पाठ होऊन गेल्या, असे शिक्षक सांगतात.
advertisement
मोठी बातमी! विद्यार्थिनीचा शाळेतच हार्टअटॅकने मृत्यू; काही दिवसातच जिल्हा परिषदेने घेतला मोठा निर्णय
शाळेच्या भिंती झाल्या बोलक्या
या उपक्रमांतर्गत शाळेच्या भिंतीच बोलक्या झाल्या. इंग्लिश, गणित, इतिहास, भूगोल, विज्ञान सर्व भाषा विषय व त्या विषयाशी संबंधित सर्व कृती विद्यार्थ्यांच्या सतत दृष्टिक्षेपात राहिल्या. त्यामुळे त्यांना या उपक्रमाचा वेगळा अभ्यास करण्याची गरज राहिली नाही. या उपक्रमामुळे शाळेची इमारत विद्यार्थी स्नेही बनली तसेच शालेय परिसर विद्यार्थ्यांसाठी पूरक बनला. या उपक्रमासाठी मी तन-मन-धन या तीनही स्वरूपात योगदान देऊन सर्व विद्यार्थ्यांसाठी अध्ययन सुकर वातावरण निर्मिती केली, असे शिक्षक गाडे सांगतात.
Location :
Bid,Bid,Maharashtra
First Published :
September 03, 2023 10:11 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/बीड/
Video: शाळेच्या भिंतीही लागल्या बोलू.., कोरोना काळातील अनोख्या कामासाठी शिक्षकाला मोठं बक्षीस