हवामान तज्ज्ञ स्वर्णाली मजूमदार यांनी दिली अपडेट
हवामान तज्ज्ञ स्वर्णाली मजूमदार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांच्या हवामान निरीक्षणात महाराष्ट्रासाठी एक महत्त्वाचा बदल दिसून आला आहे. मध्य महाराष्ट्र, पंजाब आणि हरियाणाच्या काही भागांमध्ये शीत लहरीची परिस्थिती आजही कायम आहे. महाराष्ट्राच्या दृष्टीने विशेष महत्त्वाचा असणारा थंडीचा जोर आता वाढताना दिसत आहे. तळ कोकण वगळता बाकी ठिकाणी गारठा आहे. कोकणात मात्र थंडी ओसरली आहे.
advertisement
3 ठिकाणी गारठा वाढणार
मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात अजूनही गारठा कायम आहे. काही भागांमध्ये पहाटे दाट धुक्याची चादर पसरली आहे. तापमान ७ अंश सेल्सियसपर्यंत खाली आलं आहे. येत्या काळात हा गारठा कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी, स्वेटर ब्लॅकेट, हिटरची व्यवस्था करावी असं आवाहन करण्यात आलं आहे.
2-3 अंशांने तापमानात घट होणार
उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारतातील किमान तापमानात आगामी तीन दिवसांत २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होण्याची शक्यता आहे. याचा थेट परिणाम उत्तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या तापमानावर होण्याची शक्यता आहे. समुद्रावरील हवामान प्रणाली कमजोर होऊनही दक्षिण भारतात पावसाचा धोका कायम आहे. डिप्रेशन कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतरीत झालं असलं तरीसुद्धा, आज तमिळनाडू, केरळ, तटीय आंध्र प्रदेश आणि रायलसीमाच्या काही भागांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे.
शेतकरी आणि नागरिकांसाठी महत्त्वाचा इशारा
महाराष्ट्रातील गारठा लक्षात घेता, शेतकऱ्यांनी रब्बी हंगामातील पिकांचे थंडी आणि वाढत्या गारठ्यापासून संरक्षण करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घ्यावी. तसेच, मच्छीमारांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. पुढील दोन दिवस बंगालचा उपसागर आणि अरबी समुद्रातील काही विशिष्ट भागांमध्ये मासेमारीसाठी न जाण्याचा स्पष्ट इशारा हवामान विभागाने दिला आहे.
