दक्षिण भारतात अतिवृष्टीचा धोका कायम
या हवामान प्रणालीचा थेट परिणाम अंदमान आणि निकोबार बेटांवर २३ आणि २४ नोव्हेंबर रोजी दिसून येईल, जिथे अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. याशिवाय, तामिळनाडूमध्ये २२ ते २४ नोव्हेंबर, केरळमध्ये २२ ते २३ नोव्हेंबर आणि अंदमान-निकोबार बेटांवर २१, २२ आणि २५ नोव्हेंबर रोजी जोरदार पावसाची शक्यता आहे. या भागांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्याच्या वाऱ्याचाही इशारा देण्यात आला आहे. २३ नोव्हेंबर रोजी तर अंदमान-निकोबार बेटांवर अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट' देण्यात आला आहे.
advertisement
महाराष्ट्रात थंडीची लाट नाही, उलट तापमान वाढणार
देशाच्या मध्य आणि पश्चिम भागातील हवामानात महत्त्वाचे बदल अपेक्षित आहेत. पश्चिम मध्य प्रदेशच्या काही भागांत २२ आणि २३ नोव्हेंबर रोजी शीत लहरीची (Cold Wave) स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडून वाहणारे थंड वारे आणि बंगालच्या उपसागरात येणारं वादळ यामुळे सध्या संमिश्र हवामान झालं आहे. दिवसा दमट हवामान आणि रात्री कडाक्याची पडणारी थंडी अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. याचा परिणाम महाराष्ट्रावरही होणार आहे.
महाराष्ट्रात अतिवृष्टीचा अलर्ट देण्यात आला नाही मात्र हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी अलर्ट राहावं असं आवाहन केलं आहे. पुढील तीन दिवसांत, महाराष्ट्राच्या काही जिल्ह्यांमधील किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ राज्यात थंडीचा जोर कमी होईल. त्यानंतर तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. पुढचे 48 तास पावसाची कोणतीही शक्यता वर्तवण्यात आली नाही.
उत्तर-पश्चिम भारतात मात्र थंडी वाढणार
दक्षिण भारतात पाऊस आणि मध्य भारतात थंडी कमी होण्याची चिन्हे असताना, उत्तर-पश्चिम भारतात मात्र थंडी वाढणार आहे. आगामी आठवड्यात या भागात किमान तापमानात हळूहळू २ ते ४ अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता आहे. याचा अर्थ, उत्तर भारतातील राज्यांमध्ये थंडीचा कडाका पुन्हा वाढेल. देशाच्या इतर भागांमध्ये किमान तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही.
मच्छिमारांसाठी धोक्याचा इशारा
बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने, समुद्रातील स्थिती खराब आणि वादळी बनू शकते. त्यामुळे, हवामान विभागाने मच्छिमारांसाठी खास सूचना जारी केल्या आहेत. पुढील ५ ते ६ दिवस मच्छिमारांनी मासेमारीसाठी जाऊ नये, असा कडक सल्ला देण्यात आला आहे. या नियमांचे पालन करून सुरक्षितता बाळगणे अत्यावश्यक आहे.
