दक्षिणेकडे वारं फिरलं
दक्षिण भारत आणि मध्य बंगालच्या उपसागरातील वाऱ्यांमुळे अनेक राज्यांमध्ये पुन्हा पावसाचं संकट आहे. त्याचा फटका महाराष्ट्राला देखील बसणार आहे. छत्री अजून आता ठेवण्याची वेळ आली नाही. त्याचं कारण असं की उकाडाही वाढणार आहे आणि पावसाच्या हलक्या सरी देखील पडणार आहेत. या मिश्र वातावरणामुळे हवेतील दमटपणा वाढू शकतो. पुढचे 7 दिवस महाराष्ट्रात हवामान कसं राहील? कुठे पाऊस पडेल ते जाणून घेऊया.
advertisement
पुढचे 24-48 तास महत्त्वाचे
महाराष्ट्रात अनेक ठिकाणी मागच्या 24 तासात मुसळधार पाऊस झाला. त्याचा फटका बसला आहे. मुंबईसह कोकण पट्ट्यात दमट वातावरणामुळे उकाडा वाढला आहे. दक्षिणेला अरबी समुद्रात आणि पश्चिम बंगालच्या खाडीत दक्षिणेला सायक्लोनिक सर्क्युलेशन स्थिती तयार झाली आहे. त्याची कमी दाबाच्या पट्ट्यात रुपांतर होण्याची शक्यता आहे. मात्र त्यासाठी आणखी 24 तास वाट पाहावी लागेल. ही स्थिती अशीच राहली तर वादळाचा जास्त धोका नसेल. मात्र वारे फिरले तर मोठं वादळ येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढचे 24 ते 48 तास हवामान विभाग या दोन्ही बदलांकडे लक्ष ठेवून आहे.
कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची भीती
दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे 19 ऑक्टोबर रोजी अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे तयार होण्याची शक्यता आहे. केरळ, कर्नाटक या भागांना सर्वात जास्त धोका असेल. मात्र त्याची तीव्रता किती वाढते त्यावर महाराष्ट्रातही पाऊस राहणार का ते पाहावं लागणार आहे. आज रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांसाठी हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे.
हवामान तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
हवामान तज्ज्ञ शशिकांत मिश्रा यांनी पुढच्या पाच दिवसांचे हवामानाचे अपडेट्स दिले आहेत. आज महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अति उष्ण तापमान राहू शकतं. तर तळ कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पावसाचा इशारा आहे. दक्षिणेकडील राज्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. पश्चिम बंगालच्या खाडीतही वरच्या बाजूला दोन सायक्लोनिक सर्क्युलेशन तयार झाले आहेत. 17 ऑक्टोबर रोजी कोकणात पाऊस राहणार आहे.
मच्छिमारांसाठी अलर्ट
18 आणि 19 ऑक्टोबर रोजी कोकण, मध्य महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही पट्ट्यात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडणार आहे. तर 20 आणि 21 ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रातील हवामान कोरडं राहील, उकाडा वाढेल पण दक्षिण भारतात मात्र पाऊस राहणार आहे. त्यातही कमी दाबाचा पट्टा तयार झाला तर हवामानात पुन्हा बदल होण्याची शक्यता आहे. केरळ, तमिळनाडून, आंध्रप्रदेश आणि कर्नाटक या भागातील मच्छिमारांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात मात्र मच्छिमारांसाठी तूर्तास कोणताही थेट धोका नाही.