सेन्यार चक्रीवादळाचा महाराष्ट्रावर थेट परिणाम नाही
सेन्यार चक्रीवादळामुळे अंदमान-निकोबार बेटांव २७ आणि २९ नोव्हेंबरला रोजी अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. दुसरीकडे, दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे तामिळनाडूमध्ये २६ नोव्हेंबर ते १ डिसेंबरपर्यंत जोरदार ते अति जोरदार पाऊस, तर आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये २९ आणि ३० नोव्हेंबरला खूप जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हा सगळा परिणाम प्रामुख्याने दक्षिण भारतावर असला तरी, महाराष्ट्रावर मात्र या वादळांचा थेट मोठा धोका नाही.
advertisement
महाराष्ट्रात सतत तापमानात बदल
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र कमाल तापमानात वाढ झाली आहे. 35 डिग्रीपर्यंत तापमान पोहोचलं असून घामाच्या धारा वाहात आहेत. मध्य प्रदेश आणि आसपासच्या भागांमध्ये तापमान घसरल्याने थंड वारे वाहू लागले आहेत. त्यामुळे विदर्भातील तापमान देखील घसरलं आहे. पुढच्या २४ तासांत मध्य विदर्भात तापमानात विशेष बदल होणार नाही. मात्र, त्यानंतरचे दोन ते तीन दिवस किमान तापमान २ ते ३ डिग्री सेल्सियसने घसरण्याची शक्यता आहे. याचा अर्थ विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत थंडीचा जोर वाढणार आहे. कोकण वगळता पुढील दोन दिवसांत तापमानात बदल होणार नाही, पण त्यानंतर किमान तापमान २ ते ३ डिग्रीने खाली जाईल.
उत्तर भारतातील बदलांमुळेच मध्य भारताकडे थंड वाऱ्यांचा प्रवाह
दक्षिण अफगाणिस्तानमध्ये सक्रिय झालेल्या एका ताज्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे उत्तर-पश्चिम भारतातील हवामान प्रणाली बदलत आहे. या बदलामुळे उत्तर भारतात तापमानात वाढ होईल, पण नंतर ते पुन्हा २ ते ३ डिग्रीने खाली येईल. या उत्तर भारतातील बदलांमुळेच मध्य भारताकडे थंड वाऱ्यांचा प्रवाह येईल, ज्यामुळे महाराष्ट्रात थंडी वाढेल. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात मात्र या बदलत्या हवामानामुळे पावसाच्या हलक्या सरी राहणार आहेत. 5 डिसेंबरपर्यंत ही स्थिती राहण्याची शक्यता आहे.
