सेन्यार दक्षिणेला धडकणार?
सेन्यार चक्रीवादळ तामिळनाडू आणि आंध्रप्रदेशच्या किनाऱ्याला धडकण्याची शक्यता आहे. त्याचा वेग 120 किमीपेक्षा जास्त राहील. साधारणपणे २९-३० तारखेला हे धडकण्याची शक्यता आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये यामुळे अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर महाराष्ट्रात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ढगाळ काही ठिकाणी हलक्या स्वरुपाच्या पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
देशाच्या दक्षिणेकडील समुद्रात तयार झालेल्या शक्तिशाली हवामान प्रणालीमुळे महाराष्ट्रातील थंडीच्या वातावरणावर लक्षणीय परिणाम होण्याची शक्यता आहे. एकीकडे बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या डीप डिप्रेशनमुळे दक्षिण भारतात अतिवृष्टीचा धोका असताना, या बदलांमुळे मध्य भारत आणि महाराष्ट्रात किमान तापमान झपाट्याने खाली येणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
advertisement
सेन्यार चक्रीवादळ झाले कमजोर, पण नवा धोका कायम
स्टेट ऑफ मलाक्का आणि त्याच्या लगतच्या उत्तर-पूर्व इंडोनेशियाजवळ तयार झालेले सेनियर चक्रीवादळ आता कमजोर होऊन डीप डिप्रेशनमध्ये रूपांतरित झाले आहे. मात्र, त्याचवेळी दक्षिण-पश्चिम बंगालच्या उपसागरात आणि श्रीलंका किनारपट्टीजवळ आणखी एक डीप डिप्रेशन सक्रिय झाले आहे. हे डिप्रेशन अधिक तीव्र होऊन सायक्लोनिक स्टॉर्ममध्ये बदलण्याची शक्यता असून, ते उत्तर-तामिळनाडू, पुदुचेरी आणि दक्षिण आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीकडे सरकणार आहे. यामुळे तामिळनाडूमध्ये २७ ते ३० नोव्हेंबरपर्यंत, तर आंध्र प्रदेश आणि रायलसीमामध्ये २८ नोव्हेंबर ते १ डिसेंबरदरम्यान अतिवृष्टीचा रेड वॉर्निंग इशारा देण्यात आला आहे.
पुढील दोन दिवसांत पारा घसरेल
महाराष्ट्रासाठी सर्वात महत्त्वाची बातमी म्हणजे, येथील तापमानात होणारा बदल. मध्य पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या वरच्या स्तरावर असलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे आणि राजस्थानातील सक्रिय चक्रवात परिसंचरणामुळे वातावरणावर परिणाम होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य प्रदेशात हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, पुढील दोन दिवसांत या भागातील किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने खाली येण्याची शक्यता आहे. यानंतर तापमानात मोठा बदल होणार नसला तरी, थंडीचा कडाका वाढेल.
मच्छिमारांसाठी अलर्ट
कोकण वगळता या भागात पुढील २४ तासांत तापमानात विशेष बदल होणार नाही. परंतु, त्यानंतर किमान तापमान २ ते ३ अंश सेल्सियसने घसरून थंडी वाढेल. याचा अर्थ, दक्षिणेकडील वादळी प्रणालीचा महाराष्ट्रावर थेट पावसाचा धोका नसला तरी, थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे राज्यातील नागरिक वाढत्या थंडीचा अनुभव घेतील. दक्षिण भारतात अतिवृष्टीचा इशारा लक्षात घेता, अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या काही विशिष्ट भागांत मासेमारीसाठी जाण्यास मच्छिमारांना पुढील पाच दिवसांसाठी सक्त मनाई करण्यात आली आहे.
