निर्णयापूर्वी कोणतीही चर्चा झाली नाही – शरद पवार
शरद पवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, या निर्णयापूर्वी आपल्याशी कोणतीही चर्चा करण्यात आलेली नव्हती. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि पार्थ पवार यांनी पक्षांतर्गत बैठक घेऊन हा निर्णय घेतला असावा, असे सूचक विधान त्यांनी केले. त्यांनी थेट कोणावरही आरोप केला नसला, तरी पवार कुटुंबाला विश्वासात न घेता हा निर्णय झाल्याचे स्पष्टपणे सांगितले.
advertisement
पवार कुटुंबाकडून नाराजी व्यक्त
या संपूर्ण घडामोडींवर पवार कुटुंबीयांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. एवढा महत्त्वाचा निर्णय घेताना कुटुंबीयांशी चर्चा होणे आवश्यक होते, असे मत व्यक्त केले जात आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या संभाव्य विलीनीकरणाच्या चर्चेत अजित पवार एकटेच सक्रिय होते, अशी माहितीही सूत्रांकडून समोर आली आहे.
राष्ट्रवादी एकत्र येऊ नये, अशी पार्थ पवारांची भूमिका
दरम्यान, पार्थ पवार यांची भूमिका देखील चर्चेत आली आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र येऊ नयेत, अशी त्यांची इच्छा होती. अशी माहिती समोर आली आहे. महापालिका निवडणुकांच्या काळात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढू नये अशीही पार्थ पवार यांची भूमिका होती. असं सांगण्यात आलं आहे.
विलीनीकरणासाठी अजित पवारांच्या १४ बैठका
शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आणखी एक महत्त्वाचा खुलासा केला. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत तब्बल १४ बैठका घेतल्या होत्या. या बैठकींमध्ये अजित पवार, सुप्रिया सुळे, जयंत पाटील आणि अमोल कोल्हे सहभागी होते. बैठकीत उपस्थित असलेले बहुतांश नेते विलीनीकरणाबाबत सकारात्मक होते आणि त्यातच एकत्र येण्याचा निर्णय घेण्यात आला होता, असे शरद पवार यांनी सांगितले.
दोन राष्ट्रवादी एकत्र याव्यात हीच अजितदादांची इच्छा
“दोन राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकत्र याव्यात, ही अजितदादांची मनापासून इच्छा होती. त्यांची ही इच्छा पूर्ण व्हावी, अशी आमचीही इच्छा आहे,” असे मोठे वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यांच्या या विधानामुळे तटकरे, पटेल, मुंडे आणि पार्थ पवार हे नेते विलीनीकरणाबाबत अनुकूल नव्हते, असा सूचक संदेश देण्याचा प्रयत्न शरद पवार यांनी केल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
