गुन्हेगारी विश्वात गजा मारणेची एन्ट्री
कुख्यात गज्या ऊर्फ महाराज ऊर्फ गजानन पंढरीनाथ मारणे हा मुळशीतील एका छोट्या गावातील तरुण... काही वर्षांपूर्वी गज्या मारणेचं कुटुंब कोथरूड येथील शास्त्रीनगर परिसरात राहण्यास आलं. शास्त्रीनगरला आल्यावर गजा मारणे गुन्हेगारी विश्वाकडं वळाला. पतित पावन संघटनेचे जुने कार्यकर्ते असलेल्या आणि पुणे शहरात मोठे नाव असलेल्या मिलिंद ढोले यांची हत्या करून गजा मारणे याने गुन्हेगारी विश्वात पाय ठेवलं. त्यानंतर गजा मारणे याने डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड या भागात आपली दहशत पसरवली.
advertisement
डेक्कन पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा
पोलीस सुत्रांच्या माहितीनुसार, 1988 सालच्या अखेरीस गजा मारणेवर मारामारीचा पहिला गुन्हा डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल झाला होता. त्यानंतर 1990 मध्ये डेक्कन पोलीस ठाण्यात मारामारीचे दोन तर समर्थ पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला. त्यानंतर गजा मारणेला दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आलं होतं. तिथून तीन ते चार वर्ष गजा मारणेची चर्चा सतत होत असताची.
कावेडियाची हत्या
1996 मध्ये कोथरुड पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. गजा मारणे याच्या डोक्यावर ज्या राजकीय व्यक्तीचा हात होता, त्याची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर गजा मारणे आणखी भडकला अन् त्याने 2006 साली सारसबाग परिसरातील एका हेल्थक्लबमध्ये या हत्येतील आरोपी कावेडिया आला असताना त्याच्यावर फिल्डिंग लावून हत्या केली. या घटनेनंतर गजा मारणेचं नाव आणखी मोठं झालं.
पुण्यातील टोळीयुद्ध
मिलिंद ढोले आणि बबलू कावेडिया खून प्रकरणात गजा मारणेची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली. त्यावेळी गजा मारणेचा एकेकाळचा जिवलग मित्र असलेला निलेश घायवळ याच्यासोबत वर्चस्ववादाची लढाई सुरू झाली आणि इथून सुरू झालं, पुण्यातील खुंखार टोळीयुद्ध.. पुण्यात गुन्हेगारीचं प्रमाण वाढत असताना गजा मारणेचं नाव मोठं होतं होतं. त्यामुळे पुणे पोलिसांनी मुसक्या आवळल्या अन् 2012 मध्ये पुन्हा एक वर्ष गजा मारणेवर तडीपाराची कारवाई झाली.
37 वर्षात तब्बल 28 गुन्हे
गजा मारणे याच्यावर आतापर्यंत डेक्कन, कोथरुड, सासवड, दत्तवाडी, पौड, कामोठा, शिरगाव, हिंजवडी, भारती विद्यापीठ पोलीस ठाणे अशा वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात 28 गुन्हे दाखल आहेत. गजा मारणेवर चार वेळा मोक्का कारवाई करण्यात आली आहे. कुख्यात गुंड गजा मारणेवर 37 वर्षात तब्बल 28 गुन्हे दाखल आहेत. यामध्ये खुन, खुनाचा प्रयत्न, गर्दी मारामारी, खंडणी मागण्याच्या गुन्हांचा समावेश आहे.
राजकीय नेत्यासोबत उठबस
दरम्यान, गजा मारणे याची राजकीय नेत्यासोबत ही उठबस असल्याचं दिसून आलं होतं. या गजा मारणे याने आधी पार्थ पवार, खासदार निलेश लंके यांनी घरी जाऊन भेट घेतली होती. तर मंत्री चंद्रकात पाटील यांनी गजा मारणेच्या दहीहंडी उत्सवात ही हजेरी लावली होती.