कोण आहे नीलेश घायवळ?
निलेश बन्सीलाल घायवळ हा मुळचा जामखेड तालुक्यातील सोनेगावचा. त्याचे एम कॉमपर्यंत शिक्षण झाले आहे. पुण्यातच उच्चशिक्षण घेतलेल्या नीलेशचा संबंध मारणे गँगमधील टपोरी पोरांशी आला. त्यानंतर त्याची भेट कुख्यात गुंड गजानन मारणेसोबत झाली. दोघेही कट्टर मित्र बनले. दोघांनी मिळून एकाचा खून केल्याचा त्यांच्यावर आरोप झाला. पहिल्या खुनानंतर दोघेही गुन्हेगारी विश्वाच्या प्रकाशझोतात आले. याप्रकरणात त्यांनी ७ वर्षांची शिक्षा भोगली.
advertisement
तुरुंगात जाऊन आल्यानंतर खंडणी, अपहरण, जमिनाचे व्यवहार, दलाली अशी कामे नीलेश मारणे गँगच्या साथीने करू लागला. परंतु आर्थिक व्यवहरातून गजाजन मारणेसोबत नीलेशचे जमेनासे झाले. त्याच संघर्षातून त्याने मारणे टोळीला रामराम ठोकला आणि स्वत:च्याच नावाने टोळी सुरू केली.
मारणे आणि घायवळ यांच्यातील संघर्षाला वैयक्तिक स्वरुप प्राप्त झाले. घायवळ टोळीतील गुंड पप्पू गावडेचा खून मारणे टोळीने केला. तर त्याच्या बदला म्हणून घायवळ टोळीने मारणे टोळीतील गुंड सचिन कुंडलेचा खून केला. एकमेकांच्या टोळीतील सहकाऱ्यांचा खून करून टोळीची दहशत पसरविण्याच्या नाद दोघांनाही लागला. पुढे पोलिसांनी दोन्ही टोळी प्रमुखांना अटक केली होती.
नीलेश घायवळच्या टोळीने पुण्यात खूप दहशत निर्माण केली. नीलेश घायवळ याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, मारामारी, गंभीर इजा करणे, बेकायदा शस्त्र बाळगणे, खंडणीसाठी अपहरण, असे २० पेक्षा अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. गजानन मारणे विरुद्ध घायवळ टोळी असा रक्तरंजित थराराचा पुण्याला इतिहास आहे.
जमीन व्यवहारात दोन्ही टोळींच्या शिरकाव्याने उद्भवलेल्या संघर्षातून अनेकांचा जीव गेला
१९९० आणि त्यादरम्यान पुणे आणि शहर परिसरात अनेक कंपन्यांची स्थापना झाली. पुणे हे आयटी उद्योगांचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखले जाऊ लागले. हिंजवडी, खराडी, बाणेर, वाकड, मगरपट्टा सिटी, तळेगाव अशा परिसरात आयटी कंपन्यांची कार्यालये थाटली. या काळात येथील जमिनींना सोन्याचे भाव आले. या परिसरातील जमिनींच्या व्यवहाराला प्रचंड मोठ्या प्रमाणात वेग आला. स्थानिक गुंडगिरी, जमिनीचे वाद, दलाली आणि इतर सामाजिक कारणांमुळे या भागात कायदा-सुव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनू लागली.
गेल्या काही वर्षात मारणे आणि घायवळ टोळीची दहशत कोथरुडसह पुणे शहर, मुळशी तालुक्यात आहे. मारणे आणि घायवळ टोळीत अनेक सराईत गुन्हेगार काम करतात. मुळशी तालुक्यातील जमिनींचा आलेल्या सोन्याचे भावामुळे जमीन व्यवहारात दोन्ही टोळींच्या शिरकाव्याने उद्भवलेल्या संघर्षातून अनेकांचा जीव गेल्याचा इतिहास आहे.
घायवळचे राजकारण्यांबरोबर संबंध
अनेक गुन्ह्यांत नीलेश घायवळ जेलमध्ये जाऊन आला. २०२० मध्ये नीलेश घायवळ कारागृहातून बाहेर आला. त्यानंतर कोथरुड पोलिसांनी त्याच्यावर दोन वर्षे हद्दपारीची कारवाई केली. त्यामुळे घायवळ शहरातून बाहेर गेला होता. परंतु हद्दपारीची कारवाई संपल्यानंतर नीलेशने अनेक राजकारण्यांच्या भेटी घेतल्याचेही फोटो समाज माध्यमांवर व्हायरल झाले. तत्कालिन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची गेल्या वर्षी घायवळने भेट घेतल्यानंतर मोठी चर्चाही झाली होती. तसेच पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यातही घायवळचे अनेक राजकारण्यांबरोबर संबंध आहेत.