आयएएस अंजली रमेश यांनी एप्रिल महिन्यात हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सूत्रे हातात घेतली होती. मात्र केवळ सात महिन्यांच्या कार्यकाळात अंजली रमेश यांनी अनेकांच्या डोळ्यात भरणारे काम हिंगोली जिल्ह्यात करून दाखवले. त्यांची बदली छत्रपती संभाजी नगर येथे मृदा आणि जलसंधारण आयुक्त म्हणून करण्यात आली आहे.
आयएएस अंजली रमेश यांनी केलेली उल्लेखनीय कामे
advertisement
१) हिंगोली जिल्हा हा हळदीच्या उत्पादनासाठी ओळखला जातो. हेच लक्षात घेऊन अंजली रमेश यांनी जिल्ह्यात टर्मेक्स हळद नावाने महिला शेतकऱ्यांची संस्था स्थापन केली. भविष्यात या संस्थेचा शेतकऱ्यांना मोठा फायदा होण्याची अपेक्षा आहे.
२) अंजली रमेश यांनी जिल्ह्यातील सर्व शाळा एकाच रंगाने रंगविण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीमध्ये कामासाठी येणाऱ्या गावकऱ्यांना बसण्याची सोय तसेच पिण्याच्या शुद्ध पाण्याची व्यवस्था केली. तसेच सूचना फलकावर उपलब्ध सेवांची माहिती द्यावी, असा आदेशही अंजली रमेश यांनी काढला होता.
३) अंजली रमेश यांनी जिल्ह्यातील विविध शाळांना भेटी देऊन गुणवत्ता तपासणी केली. तसेच आरोग्य केंद्रांना भेटी देऊन सुविधांची पाहणी केली.
४) जिल्हा परिषदे अंतर्गत कर्मचाऱ्यांच्या भरतीचा रखडलेला प्रश्न त्यांनी मार्गी लावला.
५) पशुसंवर्धन विभागातील गैरव्यवहारावर तडफदार पद्धतीने कारवाई करून दोषी कर्मचाऱ्यांच्या निलंबनाचे आदेश काढले.
६) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे गोरगरीब लोकांना हक्काचे घर देणाऱ्या घरकुल योजनेसंबंधात लक्ष घालून तसेच पंचायत समिती कार्यालयांना वेळोवेळी भेटी देऊन गरजूंना लाभ देण्याच्या सूचना केल्या.
