कोण आहेत मुकेश सहाणे?
मुकेश सहाणे हे नाशिकच्या स्थानिक राजकारणात परिचित नाव आहे. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपमधून केली होती. संघटनात्मक बांधणी, स्थानिक प्रश्नांवरील आक्रमक भूमिका आणि जनसंपर्क यामुळे ते भाजपमध्ये सक्रिय कार्यकर्ते म्हणून ओळखले जात होते. प्रभागातील विविध नागरी समस्या, पायाभूत सुविधा, पाणीपुरवठा आणि रस्त्यांच्या प्रश्नांवर त्यांनी सातत्याने आवाज उठवला होता. त्यामुळे त्यांना स्थानिक पातळीवर चांगला जनाधार मिळाला.
advertisement
पक्षाने तिकीट नाकारलं
यंदाच्या महापालिका निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी मिळेल, अशी सहाणेंना अपेक्षा होती. मात्र, पक्षाने त्यांना तिकीट नाकारल्यानंतर त्यांनी बंडखोरीचा मार्ग स्वीकारला. भाजपच्या निर्णयाविरोधात थेट अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्याचा धाडसी निर्णय त्यांनी घेतला. या निर्णयामुळे भाजपने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाईही केली. तरीही सहाणे आपल्या निर्णयावर ठाम राहिले आणि जनतेच्या जोरावर निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी कायम ठेवला.
या निवडणुकीत एकूण ७३५ उमेदवार रिंगणात होते. यामध्ये ५२७ राजकीय पक्षांचे उमेदवार तर २०८ अपक्ष उमेदवार होते. मात्र, या सर्वांमध्ये प्रभाग क्रमांक २९ ची लढत सर्वाधिक लक्षवेधी ठरली. अपक्ष मुकेश सहाणे आणि भाजपचे दीपक बडगुजर यांच्यात थेट सामना रंगला. दोन्ही बाजूंनी जोरदार प्रचार झाला आणि प्रभागात राजकीय वातावरण चांगलेच तापले.
बडगुजरांवर पैसे वाटपाचा आरोप
मतदानाच्या दिवशी सावतानगर परिसरात पैसे वाटप होत असल्याच्या अफवेमुळे मोठा गोंधळ उडाला. माजी आमदार सुधाकर बडगुजर यांच्या कार्यालयाबाहेर रोख रक्कम वाटली जात असल्याचा आरोप विरोधकांनी केल्यानंतर परिसरात नागरिकांची गर्दी जमली. या प्रकारामुळे काही काळ तणाव निर्माण झाला आणि ही बाब संपूर्ण शहरात चर्चेचा विषय ठरली.
ठाकरे बंधूंचा पाठिंबा
मुकेश सहाणे यांना दोन्ही ठाकरे बंधूंचा म्हणजेच मनसे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) यांचा जाहीर पाठिंबा मिळाला. या पाठिंब्यामुळे सहाणेंची ताकद आणखी वाढली. भाजपमधून बाहेर पडल्यानंतरही त्यांनी आपल्या राजकीय प्रभावाला कमी होऊ दिले नाही, हे या निवडणुकीतून स्पष्ट झाले.
