सतीश देशमुख हे बीडच्या केज तालुक्यातील वरपगावातील अल्पभूधारक शेतकरी होते. ते मराठा आरक्षण लढ्यात गेल्या दोन वर्षापासून सातत्याने सहभागी होते. मनोज जरांगे पाटील हे मुंबईकडे जाणार असल्याने सतीश देशमुख हे देखील त्यांच्या सहकाऱ्यांसोबत बुधवारी मुंबईकडे निघाले होते.पण गुरुवारी सकाळी नारायणगाव येथे सतीश देशमुख यांना हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे निधन झाले होते.त्यानंतर त्यांचं पार्थिव स्वगृही आणण्यात आलं होतं. त्याच्या या अकाली निधनाने कुटुंबिय आणि मित्रपरिवारावर दु:खाचा डोंगर कोसळला होता.
advertisement
सतीश देशमुख यांचे वडील सैन्य दलात होते तर त्यांचा भाऊ देखील सैन्य दलात आहे सतीश देशमुख यांना केवळ साडेतीन एकर जमीन असून त्यावरच त्यांचा उदरनिर्वाह चालायचा.घरातील कर्ता पुरुष गेल्याने देशमुख कुटुंबियांवर प्रथम आर्थिक आणि भावनिक संकट कोसळले आहे. दरम्यान देशमुख यांच्या पश्चात त्यांचा एक मुलगा (वय 19 वर्ष) पत्नी व आई असा परिवार आहे.
आझाद मैदानावर उद्या आंदोलन
मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेत मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.उद्या 29 ऑगस्टला एकच दिवस जरांगेंना 9 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आंदोलनाला पोलिसांनी परवानगी दिली आहे. त्यानंतर मौर्चेकरांना मैदानात थांबता येणार नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. आझाद मैदानात 7 हजार स्क्वेअर मीटरचे क्षेत्र आंदोलनासाठी राखीव असल्याने मैदानाच्या क्षमतेनुसार 5 हजार आंदोलकांना मैदानात परवानगी देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांच्या निर्णयावर जरांगे पाटील नाखूष आहेत. तुम्ही एक दिवसांची परवानगी दिली आहे, आम्ही एक दिवस आंदोलन करतो, दुसऱ्या दिवशी आमच्या मागण्या सरकारला मान्य करायला सांगा, अशी उपहासात्मक टीका मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई पोलिसांच्या परवानगीच्या निर्णयावर केली.
मुंबई उच्च न्यायालयाने एका जनहित याचिकेवरील नावणीदरम्यान मनोज जरांगे पाटील यांना मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलन करण्यास परवानगी नाकारली. परंतु मुंबई पोलिसांनी बुधवारी काही अटी शर्तींसह जरांगे पाटील यांना 29 ऑगस्ट रोजी एका दिवसाच्या आंदोलनासाठी परवानगी दिली होती.
