अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू
अजित पवार हे काल सकाळी खाजगी विमानाने मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत अजित पवारांसह एकूण पाच जणांचा मृत्यू झाला. सकाळी सुमारे ८.४५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. सुरुवातीला या अपघाताबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नव्हती. मात्र काही वेळातच विमान कोसळल्याचे स्पष्ट झाले आणि ही बातमी वाऱ्यासारखी सर्वत्र पसरली.
advertisement
राजेश टोपे काय म्हणाले?
या अपघाताची माहिती सर्वात आधी माजी मंत्री आणि शरद पवार गटातील ज्येष्ठ नेते राजेश टोपे यांना मिळाल्याचे समोर आले आहे. याबाबत स्वतः राजेश टोपे यांनी भावूक शब्दांत माहिती दिली. “माध्यमांकडे ही बातमी पोहोचण्याआधीच मला फोन आला होता. आमच्या जिल्ह्यातील एक तरुण बारामती विमानतळावर स्टोअर रूममध्ये काम करतो. त्याने सकाळी फोन करून सांगितले की अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झाला आहे. विमानाचा शेवटचा भाग फक्त दिसतोय, उर्वरित सगळं जळून खाक झालं आहे,” असे टोपे यांनी सांगितले. “आज माझा वडीलधारा भाऊ गेल्यासारखी भावना आहे,” असे म्हणत ते अश्रूंना आवर घालू शकले नाहीत.
पवार कुटुंबीय दिल्लीत
अपघाताच्या वेळी संपूर्ण पवार कुटुंब जवळपास दिल्लीत होते. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी खासदार सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार हे सर्व दिल्लीमध्ये उपस्थित होते. दुर्घटनेची माहिती मिळताच पवार कुटुंबाने तातडीने बारामतीकडे धाव घेतली. कुटुंबातील सर्व घटकांना जोडणारा दुवा असलेल्या अजित पवारांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबाची वीण जणू उसवली आहे. राजकारण असो वा समाजकारण, प्रत्येक पातळीवर ठाम उभे राहणारा नेता हरपल्याची भावना आज सर्वत्र व्यक्त होत आहे.
अंत्यसंस्काराचा कार्यक्रम
अजित पवारांचे पार्थिव बारामतीतील काटेवाडी येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आले होते.आज अत्यंयात्रा विद्या प्रतिष्ठानच्या मैदानावर समाप्त झाली.आणि सकाळी ११ वाजता शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यास सुरुवात झाली आहे.
