पवारांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. सुनेत्रा पवारांचा शपथविधी सोहळा इतक्या घाईने का केला जात आहे? यामागे नेमकं काय कारणं आहेत? याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. शरद पवारांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांचे थोरले चिरंजीव पार्थ पवार बारामतीत शरद पवारांचं निवासस्थान असलेल्या गोविंदबागेत दाखल झाले आहेत. मागील सव्वा एक तासांपासून शरद पवारांसोबत बैठक सुरू आहे.
advertisement
या बैठकीला खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार, युगेंद्र पवार, रणजीत पवार असे नेतेही उपस्थित आहेत. दरम्यान, आता सुनेत्रा पवारांचा घाईघाईनं शपथविधीचा कार्यक्रम का घेतला जात आहे? याचं खळबळजनक कारण समोर आलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटातील एक गट फुटून जाऊ नये, म्हणून हा तत्काळ शपथविधीचा घेण्यात येत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. सुरुवातीपासून अजित गटातील एक गट फुटण्याच्या स्थितीत होता. अजित पवारांच्या जाण्याने पक्षफुटीची हालचाल आणखी तीव्र होऊ शकते, याच पार्श्वभूमीवर सुनेत्रा पवारांचा शपथविधी तातडीने घेतला जात असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात आली.
या शपथविधीच्या कार्यक्रमाला शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित राहावं, असा पार्थ पवारांचा आग्रह आहे. मागील सव्वा एक तासांपासून पार्थ पवार गोविंदबागेत शरद पवारांच्या निवासस्थानी आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि छगन भुजबळ यांचा राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र करण्याला विरोध आहे. त्यांनी विलीनीकरणासंदर्भात यू टर्न घेतल्याची देखील माहिती मिळत आहे.
