या अपघातात संबंधित पोलीस कर्मचाऱ्यासह त्यांची पत्नी आणि दोन मुलांचा या अपघातात मृत्यू झाला आहे. रस्ते अपघातात अशाप्रकारे कुटुंबाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
प्रशांत वैद्य असं मृत पावलेल्या पोलीस कर्मचाऱ्याचं नाव आहे. सोमवारी मध्यरात्री ते आपली पत्नी प्रियंका वैद्य आणि दोन मुलांसह कारने वर्ध्याकडे जात होते. तिरोडा गावाजवळ आल्यानंतर अचानक रस्त्यावर एक रानडुक्कर आडवं आलं. भरधाव वेगात असलेल्या कारने या डुक्कराला उडवलं. यानंतर प्रशांत वैद्य यांचं कारवरील नियंत्रण हटलं. त्याचवेळी समोरून डिझेल टँकर येत होता. कारचा वेग जास्त असल्याने भरधाव वेगाने कार डिझेल टँकरला धडकली.
advertisement
कार आणि टँकरची समोरासमोर जोरदार टक्कर झाल्याने यात पोलीस कर्मचारी प्रशांत वैद्य यांच्या पत्नी प्रियंका आणि दोन वर्षांच्या मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर प्रशांत वैद्य आणि त्यांच्या पाच वर्षांच्या मुलीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एका रानडुक्करामुळे हसतं खेळतं कुटुंब काळाच्या पडद्याआड गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.