बारामती नगर परिषद निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने प्रचाराला प्रारंभ केला. या प्रचारात युगेंद्र पवार यांनी सहभाग नोंदवून उमेदवारांचे मनोधैर्य वाढवले. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधत अजित पवार यांच्यावर अतिशय गंभीर आरोप केले.
प्रतिस्पर्धी लोकांना २० २० लाख रुपये दिले
बिनविरोध झालेल्या आठ जागांपैकी साधारण चार जागांवर आमचे उमेदवार होते. एका एका उमेदवाराला त्यांनी वीस लाख रुपये दिले, अशी चर्चा लोकांमध्ये आहे. आमचे उमेदवार सर्व सामान्य घरातील आहेत, कष्ट करणारे आहेत. दहा वर्ष जरी त्यांनी काम केले, तरी त्यांना वीस लाख रूपये कमवता येणार नाहीत. वीस लाख-पंचवीस लाख अगदी सहजपणे त्यांनी देऊन आमची माणसे फोडली. त्यापैकी दोन उमेदवार नवीनच आपल्याकडे आलेले आहेत, ते कुठल्याही पक्षामध्ये नव्हते. त्यांनी आम्हाला सांगितले की तुम्ही जर आम्हाला संधी दिली तर आम्ही चांगलं काम करून दाखवू. आम्हाला वाटलं त्यांच्यावर विश्वास ठेवू, ते चांगलं काम करतील.
advertisement
बेसुमार पैशांचा वापर, आमच्या लोकांवर प्रचंड दबाव, सामान्य माणसं घाबरतात
बरेच लोक हे मुद्दाम करण्यासाठी येतात. कारण पैशांची सवय गेल्या काही वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी लावली आहे. एक तर पैशाचा वापर मोठ्या प्रमाणात केला गेला. आमचे उमेदवार हे सर्व छोटे व्यवसायिक आहेत. आपण उच्च शिक्षित, उच्च प्रतिमा असलेले तरुण सामाजिक कुटुंबातील उमेदवार दिलेले आहेत. प्रतिस्पर्ध्यांनी दबाव आणला की लोक घाबरतात. आमच्या समोर खूप मोठी शक्ती आहे. आज त्यांच्याकडे सत्ता आहे, पैसा आहे, संस्था आहेत. हे सगळे तिथे काम करत असतात. त्यांच्यावर दबाव आणला जात असेल तर मग दोन-तीन लोक जाणार हे साहजिक आहे. शेवटी लहान माणसाला भीती वाटते. जो सामान्य घरातला असतो, तो घाबरून जातो. आमच्या उमेदवारांवर प्रचंड दबाव आणला जात आहे. लोकसभेला विधानसभेला आपल्याला बघायला मिळाले. आता नगरपालिकेच्या निवडणुकीत देखील बघायला मिळत आहे.
फक्त एक संधी देऊन बघा...
सर्व बारामतीकरांना विनंती आणि आवाहन करेन की या वेळेला तुम्ही सामान्य घरातील लोकांना एकदा संधी देऊन बघा. आमचे उमेदवार उच्चशिक्षित आहेत, लोकांमध्ये मिळून मिसळून राहतात. जर लोकशाही जिवंत ठेवायची असेल, चांगला मजबूत विरोधी पक्ष जिवंत ठेवायचा असेल तर मग राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला यांच्या उमेदवाराला तिथे निवडून द्या, असे युगेंद्र पवार म्हणाले.
