यात्रेमुळे मतदानावर परिणाम होण्याची भीती
5 फेब्रुवारी रोजी श्री मायाक्का देवीची वार्षिक यात्रा आहे. महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या तीन राज्यांतील भाविकांची या यात्रेवर अलोट श्रद्धा आहे. विशेषतः सांगली, सातारा, कोल्हापूर आणि सोलापूर या जिल्ह्यांतील लाखो भाविक हजारो बैलगाड्यांसह या यात्रेसाठी मार्गस्थ होतात. मतदानाच्या दिवशीच यात्रेचा मुख्य सोहळा असल्याने, ग्रामीण भागातील मतदारांचा मोठा गट मतदानापासून वंचित राहू शकतो आणि परिणामी मतदानाचा टक्का कमालीचा घसरू शकतो, असे निवेदन पडळकर यांनी दिले आहे.
advertisement
निवडणूक आयोगाशी सविस्तर चर्चा
आमदार पडळकर यांनी मुंबईत निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांची प्रत्यक्ष भेट घेऊन यात्रेचे धार्मिक आणि सामाजिक गांभीर्य पटवून दिले. तसेच निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांच्याशी दूरध्वनीवरून सविस्तर चर्चा केली. लोकशाहीचा उत्सव आणि धार्मिक भावना यांची सांगड घालण्यासाठी मतदानाच्या तारखेचा पुनर्विचार करावा, अशी आग्रही मागणी त्यांनी यावेळी केली.
प्रशासकीय हालचालींना वेग
या निवेदनाची गंभीर दखल घेत निवडणूक आयोगाने तातडीने पावले उचलली आहेत. सोलापूर, सांगली, सातारा आणि कोल्हापूर या चारही जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून यात्रेचे स्वरूप आणि मतदानावर होणारा संभाव्य परिणाम याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तातडीने मागवण्यात आला आहे.
सकारात्मक निर्णयाची प्रतीक्षा
मतदारांचा हक्क अबाधित राखण्यासाठी आणि लोकशाहीची प्रक्रिया बळकट करण्यासाठी आमदार पडळकर यांनी घेतलेल्या पुढाकाराचे सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या अहवालानंतर निवडणूक आयोग मतदानाच्या तारखेबाबत काय 'सकारात्मक निर्णय' घेणार, याकडे आता संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
