बदललेल्या निवडणुकीच्या तारखेमुळे हजारो शिक्षक TET परीक्षेला मुकणार आहेत. जिल्हा परिषद निवडणूक आणि शिक्षकांच्या CTET परीक्षा एकाच दिवशी असल्याने शिक्षकही संभ्रमात आहेत. राज्यातील जिल्हा परिषद आणि आणि पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी हजारो शिक्षकांना निवडणूक ड्युटी लावण्यात आली आहे.
मात्र परीक्षेच्या दिवशीच निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याने शिक्षक संभ्रमात आहेत. परीक्षा विहित वेळेत पास करणे हे सुद्धा शिक्षकांना बंधनकारक आहे. त्यामुळे शिक्षक परीक्षेला मुकणार नाही, याबाबत नियोजन करण्याची मागणी महाराष्ट्र राज्य आदर्श शिक्षक समितीने केली आहे.
advertisement
आदर्श शिक्षक समितीने पत्रात काय म्हटले आहे?
दिनांक 29/1/2026 रोजी आपण दिलेल्या निवेदनानुसार महाराष्ट्रातील जिल्हा परिषदेच्या निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल केला असून सदर निवडणूक 7 फेब्रुवारी 2026 रोजी जाहीर केली आहे. परंतु केंद्र शासनामार्फत घेतली जाणारी CTET ही शिक्षक पात्रता परीक्षा दिनांक 7 व 8 फेब्रुवारी 2026 रोजी अगोदरच नियोजित झालेली आहे. जर 7 फेब्रुवारी 2026 रोजी निवडणुका घेतल्या तर या कामी असलेले महाराष्ट्रातील हजारो शिक्षक या परीक्षेला मुकणार आहेत. सदर परीक्षा विहित वेळेत पास करणे हे सुद्धा बंधनकारक आहे. त्यामुळे ही मोठी अडचण लक्षात घेता. निवडणूक आयोगास विनंती आहे की आपण याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा आणि शिक्षक या परीक्षेला मुकणार नाहीत याबाबत नियोजन करावे ही नम्र विनंती.
निवडणूक कार्यक्रमात बदल
सर्वोच्च न्यायालयाने या निवडणुकांसाठी 31 जानेवारी 2026 च्या पुढे फक्त दोन आठवड्यांची मुदत वाढ दिली आहे; परंतु उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी 2026 रोजी अपघाती निधन झाल्यामुळे राज्य शासनाने राज्यात 28 जानेवारी 2026 ते 30 जानेवारी 2026 पर्यंत दुखवटा जाहीर केला आहे. या कालावधीचा विचार करून जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांच्या कार्यक्रमातील उर्वरित टप्प्यांमध्ये बदल करण्यात आले आहेत.
