जालना: हिवाळ्याची चाहूल लागताच हुरडा पार्टीचे बेत रंगू लागतात. मराठवाड्याच्या मातीतील अस्सल गावरान हुरडा खाण्याची बात काही औरच असते. जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनेक शेतकरी हुरडा विक्रीचा व्यवसाय करतात. या हंगामी व्यवसायातून दरवर्षी हे शेतकरी लाखो रुपये कमावतात. मराठवाड्यासारख्या दुष्काळी भागात ज्वारीपासून फारसं उत्पन्न हाती येत नाही. मात्र हुरडा विक्रीचे योग्य नियोजन आणि व्यवस्थापन केल्याने या शेतकऱ्यांच्या हाती पैसा खेळू लागला आहे.
advertisement
हिवाळा सुरू होताच जालना शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसरात काही शेतकरी हुरडा घेऊन त्याची हातावर विक्री करतात. तब्बल 300 ते साडेतीनशे रुपये किलो या दराने या हुरड्याची विक्री होते. गुळ भेंडी, सुरती अशा वेगवेगळ्या प्रकारचा हुरडा विक्रीसाठी आणला जातो. जालना शहरापासून थोड्या अंतरावर असलेल्या आसपासच्या गावातील शेतकरी दरवर्षी हुरडा लागवडीचे नियोजन करतात.
Video : महाराष्ट्र केसरी बैलाचं अकाली निधन, लाडक्या खंड्याची मालकानं बांधली समाधी
एका एकरातून दीड लाखांची कमाई
हुरडा लवकर काढणीस यावा यासाठी मूग किंवा अन्य लवकर येणाऱ्या पिकाचे नियोजन केलं जातं. गुळ भेंडी किंवा सुरती किंवा अन्य जातीच्या हुरड्याची पेरणी केली जाते. त्याची योग्य निगा राखून अडीच ते तीन महिन्यांनी हुरडा काढणीस येतो. दररोज 20 ते 50 किलो हुरडा छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे हातावर किंवा किरकोळ विक्रेत्यांना विकला जातो. यातून दररोज दोन ते पाच हजार रुपयांची कमाई होते. दोन ते अडीच महिन्याच्या सीजनमध्ये एक एकर ज्वारीतून या शेतकऱ्यांना एक ते दीड लाखांचे हमखास उत्पन्न होते. कोरडवाहू ज्वारीची पेरणी केल्यास केवळ 25 ते 30 हजाराचे निव्वळ उत्पन्न होते. मात्र, हुरडा लागवड करून त्याचे योग्य विक्री व्यवस्थापन केल्याने हे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत.
350 रुपये प्रति किलोपर्यंत दर
आम्ही मागील चार ते पाच वर्षांपासून हुरडा लागवड आणि विक्रीचा व्यवसाय करतोय. यातून आम्हाला चांगले पैसे मिळतात. एक एकर हुरडा लागवडीतून पाच ते सहा क्विंटल उत्पन्न मिळते. त्याला छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हातावर विक्री केल्यास 300 ते 350 रुपये किलोचा दर मिळतो. यातून आम्हाला 90 हजार ते दीड लाखापर्यंत उत्पन्न मिळतं. त्यामुळे आमच्या गावातील सात ते आठ लोक हा व्यवसाय करत आहेत, असं वैभव शेळके यांनी सांगितलं.
वाह रं पठ्ठ्या...छत्रपती शिवरायांचा मावळाच तू; वय अवघं साडेचार वर्ष अन् सर केले 103 किल्ले!
शिक्षणाला हातभार
जालना शहरात कुटुंबासह राहणारा कृष्णा शेळके आणि त्याची कुटुंबीय देखील हुरडा विक्रीचा व्यवसाय करतात. दरवर्षी आपल्या शेतामध्ये एक एकर हुरडा लावतात आणि त्याची छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यावर हातावर विक्री करतात. यातून त्यांना एक ते दीड लाखाचे उत्पन्न मिळतं. यातूनच कृष्णा आणि त्याच्या मोठ्या भावाचे शिक्षण पूर्ण होत आहे. कोरडवाहू जमिनीत फारसं उत्पन्न होत नसल्याने हुरडा विक्रीच्या व्यवसायाने आमच्या शिक्षणाला हातभार लावला, असं कृष्णा शेळके सांगतो.