सातारा : सातारा शहराजवळ रेल्वे स्टेशन असलेले महागाव हे ऊस पिकासाठी गेल्या अनेक वर्षांपासून प्रसिद्ध आहे. पिढ्यानपिढ्या या गावात ऊसाची शेती केली जात होती. मात्र, युवा प्रगतशील शेतकरी विशाल चव्हाण यांनी या पिढ्यान पिढ्या चालत आलेल्या शेतीला फाटा देत सुधारित तंत्राद्वारे सोयाबीनची यशस्वी शेती केली आहे. विशेष म्हणजे उत्पादनावर भर देत एकरी 17 ते 22 क्विंटल पर्यंत उत्पादनाची क्षमता त्यांनी आपल्या कौशल्यातून आणि शेतीपूर्ण अभ्यासातून गाठली आहे. जाणून घेऊयात, त्यांची प्रेरणादायी कहाणी.
advertisement
सातारा शहरालगत असलेल्या छोट्याशा गावातील विशाल चव्हाण यांनी एमएचे शिक्षण पूर्ण केले. तसेच आपल्या वडिलोपार्जित असलेल्या शेतीची सर्व जबाबदारी घेतली. त्यांच्या कुटुंबाची 12 एकर शेती असून सर्व बागायत शेती आहे. यात गेल्या अनेक वर्षांपासून सर्वाधिक क्षेत्रात उसाचे उत्पादन घेण्यात येत होते. याच परंपरेला विशाल चव्हाण यांनी फाटा देत आधुनिक युगात आधुनिक तंत्रांचा वापर करून वेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला.
यासाठी त्यांनी कृषी विभाग कृषी विज्ञान केंद्रातील तज्ज्ञांशी संपर्क साधला. त्यांच्याकडून सुधारित तंत्र पद्धतीने सोयाबीन शेतीसाठी मार्गदर्शन घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाचा अवलंब करीत त्यांनी आपल्या 2 एकर क्षेत्रामध्ये 2018 मध्ये एकरी 10 क्विंटलप्रमाणे सोयाबीनचे यशस्वी उत्पादन घेतले. त्यानंतर या पिकात हळूहळू हातखंडा तयार होऊ लागला. मग त्यांनी आपल्या उर्वरित क्षेत्रातही सोयाबीनची लागवड करण्याचा निर्णय घेतला. विक्री करत असताना कृषी विज्ञान केंद्राचे समन्वयक शास्त्रज्ञ यांचे मार्गदर्शनाखाली या बिजांची विक्री केली जाते, असेदेखील त्यांनी सांगितले.
यामध्ये त्यांनी एक ग्रुप तयार केला. या ग्रुपमध्ये 15 हून अधिक आधुनिक शेती करणारे शेतकरी आहेत. हे सर्व शेतकरी बीजोउत्पादनावर भर देऊन दर्जेदार आणि उच्च प्रतीची बियाणे आपल्या शेतात लावत आहेत. विशाल चव्हाण या प्रगतशील शेतकऱ्याने 10 एकरात सोयाबीन पिकाची लागवड करण्यास सुरुवात केली. यासाठी त्यांनी राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातून केडीएस 992 फुले दूर्वा, केडीएस 753 फुले किमिया, फुले संगम हे वाण आपल्या शेतात घेतले.
तसेच पिकाची पावसाळ्यात हानी होऊ नये यासाठी लागवडीपूर्व शेतात बीबीएफ यंत्राद्वारे गादी वाफे म्हणजेच बेड तयार केले. त्यामुळे बेडच्या दोन्ही बाजूंना सरी तयार होते. बेडवर दोन झाडांतील अंतर सात इंच राहील, अशी टोकणी मजुरांद्वारे केली आणि सोयाबीनला पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून वाचवले. या सोयाबीन पिकाला ड्रोनचा वापर करून देखील औषधांची फवारणी केली जाते. त्याचबरोबर सुधारित यंत्रांचा वापर केल्याने त्यांना बियाणे आणि अन्य खर्चात देखील मोठी बचत होऊ लागली.
सततच्या पावसामुळे कपाशी पिकाचे नुकसान, शेतकऱ्यांनी नेमक्या कोणत्या उपाययोजना कराव्यात?, VIDEO
त्याचबरोबर बेड पद्धतीमुळे सूर्यप्रकाश भरपूर आणि योग्य प्रमाणात मिळाल्याने पिकांची वाढ एकसारखी होऊ लागली आहे. याच आधुनिक पद्धतीचा वापर करून सोयाबीनच्या पिकाला फुटव्यांची संख्या जास्त असल्याने शेंगांचे प्रमाणही चांगले मिळू लागले आहे.
एकरी सोयाबीनचे उत्पादन किती -
त्यांच्याकडे दोन ट्रॅक्टर, औषध फवारणीसाठी ड्रोन, बीबीएफ यंत्र, पलटी नांगर, फनफाळी, पाचट कुट्टी, खोडवा, कटर, मळणीयंत्र यांसारखी अनेक आधुनिक यंत्रेही आहेत. याचाच वापर करुन यावेळी एकरी सरासरी 15 ते 20 क्विंटल पर्यंत उत्पादन मिळणार, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्ती केली आहे. त्याचबरोबर या सोयाबीन बीज उत्पादन केल्यानंतर त्याची विक्री 100 ते 150 रुपये प्रति किलो दर मिळतो आहे. त्यामुळे अंदाजे एक एकरी सरासरी 1 लाख रुपये सोयाबीन मधून उत्पादन होईल, असा अंदाजही व्यक्त केला आहे.





