सोलापूर: सध्याच्या काळात काही शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करत आहेत. सोलापूर जिल्हा हा दुष्काळी म्हणून ओळखला जातो. तरीही जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी शेती क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केली आहे. यामध्ये मोहोळ तालुक्यातील पापरीचे शेतकरी विलास जगन्नाथ टेकळे यांच्याही नावाचा समावेश होतो. रासायनिक खतांच्या धोक्यांची जाणीव झाल्याने अनेकांचा विरोध झुगारून त्यांनी सेंद्रिय शेतीचा मार्ग पत्करला. तीन वर्षांच्या प्रयत्नातून नैसर्गिक फळ संजीवकाची निर्मिती केली. आता गोआधारित सेंद्रिय शेतीच्या मार्गदर्शनासाठी त्यांच्याकडे अनेक शेतकरी येत आहेत.
advertisement
विरोध झुगारून सुरू केली सेंद्रिय शेती
मोहोळ तालुक्यातील पापरी हे शेती क्षेत्रात नावाजलेलं गाव आहे. येथील शेतकरी आपल्या शेतात विविध प्रयोग करतात. विलास टेकळे यांना साडेतीन एकर शेती आहे. आधुनिक शेतीचा मार्ग पत्करत सुरुवातीला त्यांनी ऊस आणि केळीसारखी पिके घेतली. मात्र, या पिकांसाठी वापरण्यात येणाऱ्या रासायनिक खते आणि औषधांच्या धोक्याची जाणीव त्यांना झाली. त्यामुळे उसावरील रासायनिक खतांचा खर्च कमी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. यातूनच सेंद्रिय शेतीकडे वळलो, असे टेकळे सांगतात.
मराठी शाळा उत्तम! महाराष्ट्रातल्या 'या' शाळेत 25 आदर्श शिक्षक, शहरातून येतात विद्यार्थी
सेंद्रिय शेतीचं घेतलं मार्गदर्शन
शेतातील रासायनिक खतांचा वापर करमी करण्यासाठी सुरुवातील सेंद्रिय शेतीची माहिती घेण्यास सुरुवात केली. सेंद्रिय शेती मार्गदर्शक नाना नलगे आणि नानासाहेब कदम यांचे मार्गदर्शन घेतले. त्यानुसार शेतात प्रयोग सुरू केले. परंतु, रासायनिक खतांचा वापर बंद केल्यावर पहिल्याच वर्षी उत्पादनात घट झाली. त्यामुळे कुटुंबीयांसह अनेकांनी या शेती पद्धतीवर आक्षेप घेतला. पण तरीही सेंद्रिय शेतीच्या निर्णयावर ठाम राहिलो. पुढे हळूहळू उत्पन्न वाढत राहिले, असे विलास टेकळे यांनी सांगितले.
नैसर्गिक फळ संजीवकाची निर्मिती
विलास टेकळे यांनी तीन वर्षे अभ्यास करून नैसर्गिक फळ संजीवक तयार केले. गुळ आणि इतर वस्तूंपासून हे संजीवक तयार केले. त्यामुळे शेतीसाठी चांगला फायदा झाला. पिकांच्या मुळींची चांगली वाढ होऊ लागली. फूल व फळ गळती कमी झाली आणि फळांना तजेलदार रंग येऊ लागला. मिरचीवरील रोग गायब झाले. तसेच संजीवक नैसर्गिक असल्याने ते दीर्घकाळ टिकते. याचे फायदे लक्षात घेता लवकरच व्यावसायिक स्वरुपात याची निर्मिती करणार असल्याचे शेतकरी टेकळे सांगतात.
दुधाच्या हिशोबाचं आता नो टेन्शन ! सोलापूरकर तरुणांनी बनवलं खास ॲप
विषमुक्त भाजीसाठी परसबाग
सध्याच्या काळात रासायनिक औषधांची फवारणी केलेल्या विषयुक्त भाज्या सर्वत्र मिळतात. त्याचे परिणामही आपल्याला भोगावे लागतात. म्हणून घराजवळ ती गुंठे क्षेत्रात सेंद्रिय परसबाग केली. या बागेत घरात लागणाऱ्या सर्व भाजीपाल्याची लागवड केली जाते. नैसर्गिक संजीवक आणि सेंद्रिय खतांचा वापर करूनच या भाज्या पिकवल्या जातात आणि त्या विषमुक्त भाज्याच घरी वापरल्या जातात.
विविध पुरस्कारांनी सन्मान
विलास टेकळे यांच्या सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांना विविध ठिकाणी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांनी तयार केलेल्या संजीवक शेतकऱ्यांसाठी फायद्याचे ठरतेय. तर परसबागेचा उकप्रकमही बचत गट चळवळीने स्वाकारून त्याची व्याप्ती वाढवली आहे. कृषी विज्ञान केंद्राच्या अंतर्गत मोहोळ तालुका सर्वोत्कृष्ठ सेंद्रिय शेती पुरस्कार मिळाला. तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतात. तर वेळोवेळी कृषी विभागामार्फत इतर राज्यातही मार्गदर्शक म्हणून टेकळे यांची निवड झालीय.