वैशाली : आज अनेक ठिकाणी महिलासुद्धा पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे जात आहेत. प्रत्येक क्षेत्रात महिला आपले अस्तित्त्व सिद्ध करत आहे. फक्त गरज आहे, त्यासाठी उत्तम प्रशिक्षणाची. उत्तम प्रशिक्षण दिले गेले, योग्य माहिती मिळाली तर महिलाही चांगले कार्य करू शकतात. आज अशाच एका महिलेबाबत जाणून घेणार आहोत, ज्यांनी फक्त 15 दिवसांच्या प्रशिक्षणावर आपले आयुष्यच बदलले.
advertisement
बिहारमधील वैशाली जिल्ह्यातील बाकरपुर हरपूर गावात राहणाऱ्या आरती कुमारी या महिलेची ही कहाणी आहे. त्या स्ट्रॉबेरीची शेती करून स्वावलंबी तर झाल्या आहेच. मात्र, एक महिला शेतकरी म्हणूनही त्यांनी स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आरती यांनी लोकल18 शी बोलताना सांगितले की, मला सुरुवातीपासूनच शेतीची आवड होती. याआधी त्या भाजीपाल्याची लागवड करायच्या. मात्र, इतर शेतकऱ्यांपेक्षा काहीतरी वेगळे करण्याच्या इच्छेमुळे मी स्ट्रॉबेरीच्या लागवडीकडे आकर्षित झाली आणि आता मी मोठ्या प्रमाणावर स्ट्रॉबेरीची लागवड करून चांगला नफा कमावत आहे.
स्ट्रॉबेरीची लागवड ऑक्टोबरमध्ये केली जाते आणि जानेवारी ते मे महिन्याच्या अर्ध्यापर्यंत फळे येतात ते स्थानिक बाजारात विकले जाते. एका स्ट्रॉबेरीच्या रोपातून एक किलोपर्यंत फळे येतात. यामुळे स्ट्रॉबेरीच्या लागवडीत चांगला नफा मिळतो. याशिवाय हे फळ आरोग्यासाठीही खूप फायदेशीर आहे. त्यामुळे स्ट्रॉबेरीला बाजारात चांगला भाव मिळतो, असेही त्या म्हणाल्या.
त्यांनी हाजीपूर कृषी विज्ञान केंद्रातून स्ट्रॉबेरी लागवडीचे प्रशिक्षण घेतले. 15 दिवसांच्या प्रशिक्षणात स्ट्रॉबेरी शेतीची संपूर्ण माहिती घेतली. यानंतर 100 रोपांपासून त्याची लागवड सुरू झाली. सध्या त्यांनी आपल्या शेतात स्ट्रॉबेरीची 2 हजार रोपांची लागवड केली आहे. याठिकाणी स्ट्रॉबेरीची लागवड पाहण्यासाठी जिल्हाभरातून शेतकरी येतात. एका झाडाचे उत्पादन 500 ग्रॅम ते एक किलोग्राम पर्यंत असते. याठिकाणी त्या आज चार ते पाच महिलांना रोजगारही देत आहेत. ते 200 ग्रॅमचे पॅकेट बनवतात आणि ते 120 रुपयांना विकतात, अशी सर्व माहिती त्यांनी लोकल18 शी बोलताना दिली.