TRENDING:

दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं

Last Updated:

Mass Layoffs: जागतिक टेक दिग्गज अ‍ॅमेझॉनने पुन्हा एकदा मोठी नोकरकपात जाहीर केल्याने हजारो कर्मचाऱ्यांसह त्यांच्या कुटुंबांवर अनिश्चिततेचं संकट ओढावलं आहे. अवघ्या काही महिन्यांत दुसऱ्यांदा झालेल्या या कपातीमुळे नोकरीची शाश्वती आणि उद्याचा सवाल पुन्हा ऐरणीवर आला आहे.

advertisement
मुंबई: जागतिक टेक दिग्गज अ‍ॅमेझॉनने 28 जानेवारी रोजी जाहीर केले की कंपनी जगभरात 16,000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करत आहे. ही गेल्या तीन महिन्यांतील अ‍ॅमेझॉनमधील दुसरी मोठी नोकरकपात असून, महामारीच्या काळात झालेल्या अतिरिक्त भरतीनंतर (over-hiring) संस्थेची पुनर्रचना करण्याच्या आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) साधनांचा वापर वाढवण्याच्या प्रयत्नांचा हा भाग असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.
News18
News18
advertisement

याआधी काही महिन्यांपूर्वीच अ‍ॅमेझॉनने 14,000 पदे कमी करण्याची घोषणा केली होती. या दोन्ही टप्प्यांतील कपाती एकत्र केल्यास, कामावरून कमी करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या साधारणपणे 30,000 च्या आसपास पोहोचते. ही संख्या 2022 च्या उत्तरार्धात आणि 2023 च्या सुरुवातीला अ‍ॅमेझॉनने केलेल्या सलग नोकरकपातीची आठवण करून देते, ज्यामध्ये सुमारे 27,000 कर्मचाऱ्यांवर गंडांतर आले होते.

advertisement

अ‍ॅमेझॉनच्या पीपल एक्सपीरियन्स अँड टेक्नॉलॉजी विभागाच्या वरिष्ठ उपाध्यक्षा बेथ गॅलेटी यांनी या निर्णयाबाबत अधिकृत निवेदनात सांगितले, आज आम्ही घेत असलेल्या निर्णयांचा परिणाम अ‍ॅमेझॉनमधील सुमारे 16,000 पदांवर होणार आहे. ज्यांच्या भूमिकांवर परिणाम होणार आहे, त्या सर्वांना मदत करण्यासाठी आम्ही पुन्हा एकदा पूर्ण प्रयत्न करत आहोत. याची सुरुवात अमेरिकेतील बहुतांश कर्मचाऱ्यांना अंतर्गत स्वरूपात नवीन भूमिका शोधण्यासाठी 90 दिवसांची मुदत देऊन केली जाईल. आंतरराष्ट्रीय स्तरावर मात्र स्थानिक आणि देशनिहाय नियमांनुसार ही वेळ वेगवेगळी असू शकते.

advertisement

गॅलेटी पुढे म्हणाल्या, ज्यांना अ‍ॅमेझॉनमध्ये नवीन भूमिका मिळू शकणार नाही किंवा जे अंतर्गत संधी शोधण्याचा निर्णय घेणार नाहीत, अशा कर्मचाऱ्यांना सेव्हरन्स पे, आउटप्लेसमेंट सेवा, आरोग्य विमा सुविधा (लागू असल्यास) आणि इतर संक्रमणकालीन मदत दिली जाईल.

संस्थेच्या पुनर्रचनेबाबत बोलताना गॅलेटी यांनी सांगितले की, आम्ही व्यवस्थापनातील अनावश्यक स्तर कमी करून, जबाबदारीची भावना वाढवून आणि नोकरशाही दूर करून संस्थेला अधिक मजबूत बनवण्यावर काम करत आहोत.

advertisement

30 सप्टेंबरपर्यंत अ‍ॅमेझॉनमध्ये एकूण सुमारे 15.7 लाख कर्मचारी कार्यरत होते. यापैकी बहुसंख्य कर्मचारी वेअरहाऊस आणि लॉजिस्टिक्स विभागात कार्यरत आहेत. कंपनीच्या कॉर्पोरेट वर्कफोर्सची संख्या सुमारे 3.5 लाख असून, नव्याने जाहीर करण्यात आलेली कपात ही या कर्मचाऱ्यांपैकी सुमारे 4.6 टक्के इतकी आहे.

कंपनीतील कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण होणाऱ्या चिंतेवर उत्तर देताना गॅलेटी म्हणाल्या, काही जण विचारू शकतात की ही प्रत्येक काही महिन्यांनी होणाऱ्या नोकरकपातीची नवी पद्धत आहे का? पण तसं नाही. ही आमची योजना नाही.

advertisement

अ‍ॅमेझॉन व्यवस्थापनाचे म्हणणे आहे की, कंपनीला कमी व्यवस्थापन स्तर, कमी नोकरशाही आणि जलद निर्णयक्षमता हवी आहे. अ‍ॅमेझॉनचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) अँडी जॅसी यांनी याआधीही अनेकदा स्पष्ट केले आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) ही भविष्यात कंपनीच्या मनुष्यबळ रचनेत मोठा बदल घडवून आणणारी शक्ती ठरणार आहे. AI मुळे कार्यक्षमता वाढल्यास, कालांतराने अ‍ॅमेझॉनच्या कॉर्पोरेट कर्मचाऱ्यांची संख्या कमी होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे.

अ‍ॅमेझॉनसह मेटा प्लॅटफॉर्म्स (फेसबुकची पालक कंपनी) आणि मायक्रोसॉफ्ट यांसारख्या अनेक टेक दिग्गजांनी कोविड-19 दरम्यान मागणीत झालेल्या प्रचंड वाढीमुळे मोठ्या प्रमाणावर भरती केली होती. मात्र आता हेच उद्योगसमूह आपल्या मनुष्यबळाची पुनर्रचना करत आहेत.

याशिवाय अ‍ॅमेझॉन आपल्या ई-कॉमर्स व्यवसायात पॅकेजिंग आणि डिलिव्हरी अधिक जलद करण्यासाठी वेअरहाऊसमध्ये रोबोटिक्समध्ये मोठी गुंतवणूक करत आहे. यामुळे मानवी श्रमांवरील अवलंबित्व कमी होऊन खर्चात कपात होण्याची अपेक्षा आहे.

दरम्यान अ‍ॅमेझॉन आपले तिमाही आर्थिक निकाल 5 फेब्रुवारी रोजी जाहीर करणार आहे. या पार्श्वभूमीवर नोकरकपातीचा निर्णय कंपनीच्या आर्थिक कामगिरीवर आणि भविष्यातील धोरणांवर काय परिणाम करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मराठी बातम्या/मनी/
दिग्गज कंपनीचा महाभयंकर निर्णय; 16,000 कर्मचाऱ्यांची हकालपट्टी, आतापर्यंत 30 हजार कुटुंबांवर आभाळ कोसळलं
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल