सी. जे. रॉय यांच्या आत्महत्येमागचं नेमकं कारण अद्याप अधिकृतरीत्या स्पष्ट झालेलं नाही. मात्र स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, त्यांच्या समूहाच्या आर्थिक व्यवहारांबाबत आयकर विभागाकडून गेल्या काही काळापासून कसून चौकशी सुरू होती. या तपासामुळे रॉय मोठ्या मानसिक तणावाखाली असल्याचं सांगितलं जात आहे.
चौकशी सुरू असतानाच घडला प्रकार
शुक्रवारी सकाळपासूनच आयकर विभागाचं पथक रॉय यांच्या कार्यालय आणि संबंधित ठिकाणी झडती घेत होतं. ही कारवाई दिवसभर सुरू होती. दुपारच्या सुमारास सी. जे. रॉय कार्यालयात आले, त्यानंतर लगेचच त्यांची आयकर अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू करण्यात आली. ही चौकशी साधारणपणे एका तासापर्यंत चालली.
advertisement
या दरम्यान अधिकाऱ्यांनी काही ठराविक आर्थिक कागदपत्रांची मागणी केली होती. त्यावर रॉय यांनी संबंधित कागदपत्रं आपल्या खासगी कक्षातून आणण्याची परवानगी मागितली. ही बाब तेथे उपस्थित असलेल्या अधिकाऱ्यांना पूर्णपणे सामान्य वाटली.
खासगी कक्षात गेल्यानंतर गोळीबार
रॉय आपल्या खोलीत गेल्यानंतर काही मिनिटांतच अचानक एक जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू आला. आवाज ऐकताच आयकर अधिकारी आणि कर्मचारी धाव घेत आत गेले. तेव्हा रॉय रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आढळले. त्यांनी स्वतःच्या वैयक्तिक पिस्तुलातून छातीत गोळी झाडून घेतल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.
घटनास्थळी असलेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने त्यांना उपचारासाठी बेंगळुरूतील नारायणा हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र रुग्णालयात पोहोचताच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.
पोलीस तपास सुरू
या घटनेनंतर पोलिसांनी संपूर्ण परिसर ताब्यात घेतला असून आत्महत्येच्या प्रकरणाचा सविस्तर तपास सुरू केला आहे. आत्महत्येपूर्वी रॉय यांच्यावर नेमका कोणता दबाव होता, आयकर चौकशीत काय निष्पन्न झालं होतं आणि कोणत्या परिस्थितीत त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतला, याचा शोध घेण्यात येत आहे.
सध्या आयकर विभागाची कारवाई आणि आत्महत्येचा थेट संबंध आहे का, याचाही तपास केला जात आहे. उद्योगजगतातील एक मोठं नाव अशा पद्धतीने संपुष्टात येणं, ही बाब अनेक प्रश्न उपस्थित करणारी ठरत आहे.
