छत्रपती संभाजीनगर : "व्यवसाय म्हणजे बाहेर जाऊनच करता येतो," अशी आपल्याकडे अनेकांची धारणा असते. मात्र छत्रपती संभाजीनगर येथील रीना मालोदे यांनी ही मानसिकता बदलत स्वतःच्या घरातूनच मसाल्यांचा व्यवसाय सुरू करून आर्थिक स्वावलंबनाचा आदर्श घालून दिला आहे.
रीना यांनी पदवीपर्यंत शिक्षण घेतले असून त्या दोन मुलांच्या आई आहेत. त्यांचे पती स्वतःचा व्यवसाय सांभाळतात, पण रीना यांनाही काहीतरी स्वतःचे सुरू करायचे होते. मात्र, सासूबाई आजारी असल्यामुळे त्यांना घराबाहेर जाऊन व्यवसाय करणे शक्य नव्हते. याच परिस्थितीत, त्यांच्या सासूबाईंनी त्यांना घरातूनच मसाल्यांचा व्यवसाय सुरू करण्याचा सल्ला दिला.
advertisement
रीना यांनी आपल्या आई आणि सासूबाईंकडून मसाले तयार करण्याच्या पारंपरिक रेसिपी शिकल्या. त्यांनी 'अंबिका मसाले' या नावाने स्वतःचा ब्रँड तयार केला. सुरुवातीला त्यांनी मैत्रिणींना, शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना मसाल्याचे नमुने दिले. त्यातून त्यांना पहिल्या काही ऑर्डर्स मिळाल्या आणि हळूहळू व्यवसायाचा विस्तार सुरू झाला.
सासूबाईंचा आधार आणि व्यवसायाची वाढ
रीना सांगतात, "माझ्या सासूबाई आजारी होत्या, पण तरीही त्या मला नेहमी प्रोत्साहन द्यायच्या. त्यांनी मला बाहेर जाऊन स्टॉल लावण्यासाठी पाठिंबा दिला. त्यांच्या आधारामुळे मी माझ्या मसाल्यांचा स्टॉल लावायला सुरुवात केली."
स्टॉलवर येणारे ग्राहक आधी सॅम्पल मसाले घेऊन जायचे आणि चव आवडल्यावर परत ऑर्डर द्यायचे. या पद्धतीने ग्राहकांचा विश्वास आणि व्यवसायाची ओळख निर्माण झाली.
अंबिका मसालेची वैशिष्ट्ये
रीना सध्या दहा प्रकारचे मसाले तयार करतात. विशेष म्हणजे, त्या आपल्या मसाल्यांमध्ये कोणत्याही प्रिझर्वेटिव्हचा वापर करत नाहीत. नैसर्गिक आणि पारंपरिक पद्धतीने तयार केलेले हे मसाले त्यांच्या ग्राहकांना खूप आवडतात.
उत्पन्न आणि रोजगारनिर्मिती
आज रीना मालोदे यांचा व्यवसाय महिन्याला दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवत आहे. त्यांच्या या व्यवसायामुळे चार ते पाच महिलांना रोजगारही उपलब्ध झाला आहे. रीना यांचा हा प्रवास फक्त यशस्वी उद्योजिकेचा नाही, तर एक प्रेरणादायी कथा आहे, जी घरबसल्या व्यवसाय उभारण्यासाठी इच्छुक महिलांसाठी मार्गदर्शक ठरते.