खासगी जेट, 12 रोल्स रॉयल कार्स आणि 159 पेक्षा जास्त यशस्वी प्रोजेक्ट्स... सीजे रॉय यांचं आयुष्य एखाद्या चित्रपटासारखं होतं. चला जाणून घेऊया एका सामान्य मुलाचा 'रिअल इस्टेट टायकून' होण्यापर्यंतचा रंजक प्रवास.
कोचीमध्ये जन्मलेले आणि बंगळुरूमध्ये लहानाचे मोठे झालेले 57 वर्षीय सीजे रॉय (Chiriankandath Joseph Roy) हे 'कॉन्फिडंट ग्रुप' (Confident Group) चे संस्थापक आणि अध्यक्ष होते. पण त्यांची ही झेप अचानक नव्हती, तर त्यामागे होती लहानपणी त्यांच्या आईने दिलेली एक शिकवण.
advertisement
रॉय यांनी रिअल इस्टेटचं शास्त्र कोणत्याही मोठ्या बिझनेस स्कूलमध्ये नाही, तर आपल्या घरातच शिकलं. त्यांची आई बंगळुरूमध्ये छोटे-छोटे जमिनीचे तुकडे (Sites) विकत घ्यायची, त्यावर घरं बांधून विकायची. रॉय या व्यवहारांचे हिशोब ठेवायचे. जमिनीचा व्यवहार, कॅश फ्लो आणि माणसांची पारख त्यांना तिथेच उमजली. रॉय म्हणायचे, "मी व्यवसायात आवडीने आलो, पण उद्योजक झालो तो योगायोगाने."
2001 मध्ये जेव्हा बंगळुरूमधील सर्व मोठे बिल्डर्स शहराच्या मध्यभागात गुंतवणूक करत होते, तेव्हा रॉय यांनी 'सरजापूर' (Sarjapur Road) या त्यावेळच्या ओसाड भागावर मोठा पैसा लावला. त्यावेळी तिथली जमीन 6 लाख रुपये एकर होती आणि तिथे वस्तीही नव्हती.
एका बाजूला 'व्हाईटफील्ड' आणि दुसऱ्या बाजूला 'इलेक्ट्रॉनिक सिटी' विकसित होत असताना, सरजापूर हा आयटी कर्मचाऱ्यांसाठी मध्यबिंदू ठरेल, हे त्यांनी ओळखलं. घरातील आणि कंपनीतील अनेकांनी विरोध करूनही त्यांनी तिथे 150-200 एकर जमीन खरेदी केली. आज त्याच जमिनीची किंमत 10 पट वाढली आहे ते बंगळुरूचं प्रमुख आयटी हब बनलं आहे.
1991 मध्ये स्थापन झालेली 'कॉन्फिडंट ग्रुप' ही कंपनी रिअल इस्टेट क्षेत्रात दुर्मीळ अशा 'डेट-फ्री' (कर्जमुक्त) मॉडेलवर चालते. भारत, दुबई आणि अमेरिकेत मिळून त्यांनी 169पेक्षा जास्त प्रोजेक्ट्स पूर्ण केले आहेत. बंगळुरूमधील 3,000 कोटींचा 'झिऑन हिल गोल्फ काउंटी' (Zion Hill Golf County) हा त्यांचा सर्वात प्रतिष्ठित प्रोजेक्ट मानला जातो.
कार्सचं वेड: मारुती 800 ते रोल्स रॉयल
रॉय यांच्याकडे आलिशान कार्सचा मोठा संग्रह होता, ज्यामध्ये 12 रोल्स रॉयल, लॅम्बोर्गिनी आणि बुगाटी वेय्रॉन यांसारख्या गाड्यांचा समावेश होता. पण त्यांच्या या आवडीमागे एक भावनिक किस्सा होता. 1994 मध्ये जेव्हा ते पहिली मारुती कार घेण्यासाठी शोरूममध्ये गेले, तेव्हा एका सेल्समनने त्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. त्या जिद्दीतून त्यांनी जगातील सर्वोत्तम गाड्यांच्या ताफ्याचं स्वप्न पाहिलं. त्यांनी आपली पहिली मारुती 800 कार शोधण्यासाठी १० लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते आणि ती परत मिळवली सुद्धा.
मनोरंजन विश्वातील 'शोमॅन'
केवळ सिमेंट-काँक्रीटच नाही, तर मनोरंजन विश्वातही त्यांचं मोठं नाव होतं. त्यांनी मल्याळम अभिनेता मोहनलाल यांच्या 'कॅसानोव्हा' चित्रपटासह अनेक चित्रपटांची निर्मिती केली. तसेच 'बिग बॉस मल्याळम' आणि 'स्टार सिंगर' सारख्या प्रसिद्ध शोजचे ते टायटल स्पॉन्सर होते.
