मुंबई: उद्या 15 सप्टेंबरपासून सुरू होणारा आठवडा जागतिक बाजारासाठी निर्णायक ठरू शकतो. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ब्रिटन दौऱ्यापासून ते Nvidia आणि OpenAI सारख्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या मोठ्या गुंतवणुकीपर्यंत अनेक घडामोडींवर गुंतवणूकदारांचे लक्ष असेल. यासोबतच अमेरिका-चीन व्यापार वाटाघाटी, बँक ऑफ इंग्लंडची पॉलिसी बैठक आणि यूके-ईयूचे प्रमुख आर्थिक आकडे बाजाराची दिशा ठरवणारे मोठे घटक असतील.
advertisement
डोनाल्ड ट्रंप यांचा यूके दौरा
पुढच्या आठवड्यात अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ब्रिटनच्या राजेशाही दौऱ्यावर (State Visit) असतील. त्यांच्या स्वागतासाठी शाही दरबार सज्ज आहे.
सोमवार: किंग चार्ल्स आणि क्वीन कॅमिला हे विंडसर कॅसलमध्ये त्यांचे स्वागत करतील. त्यानंतर ते पंतप्रधान कीर स्टार्मर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा करतील.
बुधवार: ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलानिया यांचे औपचारिक स्वागत विंडसर कॅसलमध्ये होईल. या वेळी रॉयल कॅरेज प्रोसेशन, क्वीन एलिझाबेथ II यांच्या समाधीवर पुष्पहार अर्पण करणे आणि अमेरिकन F-35 विमाने व ब्रिटिश रेड एरोचा फ्लाईपास्ट (Flypast) असे कार्यक्रम होतील. दिवसाचा समारोप राजेशाही मेजवानीने (State Banquet) होईल. जिथे किंग आणि ट्रंप दोघेही भाषण देतील.
तंत्रज्ञान क्षेत्रातील मोठे करार
या दौऱ्याचे एक महत्त्वाचे अंग म्हणजे ट्रम्प यांच्यासोबत आलेले अमेरिकन व्यावसायिक शिष्टमंडळ. यात Nvidia आणि OpenAI सारख्या प्रमुख कंपन्यांचे प्रतिनिधी असतील. जे ब्रिटनमध्ये डेटा सेंटरमध्ये अब्जावधी डॉलर्सच्या गुंतवणुकीची घोषणा करू शकतात. हे करार यूकेच्या तांत्रिक पायाभूत सुविधांना चालना देतील आणि ब्रेक्झिटनंतर ब्रिटनला एक प्रमुख गुंतवणुकीचे केंद्र म्हणून मजबूत करतील.
अमेरिका-चीन व्यापार चर्चा
-ट्रम्प यांच्या यूके दौऱ्यासोबतच अमेरिकेचे अर्थमंत्री स्कॉट बेसेंट हे माद्रिदमध्ये चीनचे उपपंतप्रधान हे लिफेंग यांची भेट घेतील.
-या चर्चेचा मुख्य विषय टॅरिफ (आयात शुल्क), निर्यात नियंत्रणे आणि TikTok चे भविष्य असेल.
-या वाटाघाटीचे परिणाम आशियाई इक्विटी आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील शेअर्सवर होऊ शकतात.
-TikTok च्या भवितव्यावर 17 सप्टेंबरपर्यंत अमेरिकेत बंदी घालणे किंवा तिची अंशतः विक्री करण्याचा निर्णय अपेक्षित आहे.
फेडरल रिझर्व्हच्या व्याजदर कपातीची शक्यता
येत्या आठवड्यात अमेरिकन फेडरल रिझर्व्हची बैठक अपेक्षित आहे. बाजार आधीच 25 बेसिस पॉइंटच्या व्याजदर कपातीचा अंदाज लावत आहे. जर 50 बेसिस पॉइंटची कपात झाली, तर बाजारात मोठी वाढ दिसून येऊ शकते आणि सध्याची तेजी आणखी वाढेल.
या आर्थिक आकडेवारीवरही बाजाराचे लक्ष असेल:
सोमवार: युरोपियन युनियनचा (EU) व्यापार डेटा
मंगळवार: यूकेमधील बेरोजगारीचे आकडे
बुधवार: युरोपियन युनियन आणि यूकेमधील महागाईचे आकडे
शुक्रवार: यूकेमधील किरकोळ विक्री (Retail Sales)