महाराष्ट्रा शेजारी असलेल्या राज्याने निवडणुकीत अनेक मोठ्या घोषणा केल्या. 200 युनिटपर्यंत मोफत वीज, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी खात्यावर पैसे देणं, इतकंच नाही तर महिलांसाठी प्रवास मोफत अशा अनेक सोयीसुविधा दिल्या. गृह ज्योती योजना ज्या योजनेंतर्गत 200 युनिट वीज मोफत मिळते. महिलांना शक्ती योजनेंतर्गत बस प्रवास फुकट देण्यात येतो.
तर दुसरीकडे डिझेलच्या किमती वाढवल्या आहेत. पर्यायाने इतर गोष्टीही आता महाग होण्याची शक्यता आहे. कर्नाटकातील वाहनचालकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. राज्य सरकारने डिझेलवरील विक्री कर (Sales Tax) वाढवल्यामुळे डिझेलच्या किमतीत 2 रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे वाहनधारक आणि वाहतूक व्यावसायिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
advertisement
कर्नाटकात डिझेल किती महाग झाले?
कर्नाटक सरकारने 1 एप्रिल 2025 पासून डिझेलवरील विक्री कर 21.17% पर्यंत वाढवला आहे. त्यामुळे डिझेलच्या प्रति लिटर किमतीत 2 रुपयांची वाढ होऊन नवीन दर 91.02 रुपया झाला आहे. सरकारच्या निवेदनानुसार, "सक्षम प्राधिकाऱ्याच्या मान्यतेनंतर, डिझेलवरील विक्री कराचा दर 21.17% करण्यात आला असून, हा दर 1 एप्रिल 2025 पासून लागू होईल. तथापि, या वाढीनंतरही कर्नाटकमधील डिझेलचे दर शेजारील राज्यांच्या तुलनेत कमी राहतील."
शेजारील राज्यांतील डिझेल दर किती?
31 मार्च 2025 पर्यंत बंगळुरूमधील डिझेलची किंमत 89.02 रुपया होती, जी आता 91.02 रुपया झाली आहे. शेजारील राज्यांतील डिझेलच्या किमती खालीलप्रमाणे आहेत:
होसूर (तामिळनाडू): 94.42 रुपया
कासरगोड (केरळ): 95.66 रुपया
अनंतपूर (आंध्र प्रदेश): 97.35 रुपया
हैदराबाद (तेलंगणा): 95.70 रुपया
कागल (महाराष्ट्र): 91.07 रुपया
वाहतूक क्षेत्रावर परिणाम होणार?
डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहनचालक आणि लॉजिस्टिक्स कंपन्यांसमोर नवीन आव्हान उभे राहिले आहे. प्रवासी वाहतूक आणि मालवाहतुकीच्या खर्चात वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाढलेल्या इंधन दरांचा परिणाम महागाईवर होऊ शकतो, कारण वाहतुकीचा खर्च हा थेट वस्तू आणि सेवांच्या किंमतींवर परिणाम करतो. कर्नाटकमधील डिझेल दर अद्याप शेजारील राज्यांपेक्षा तुलनेने कमी असले तरी, ही वाढ सर्वसामान्यांसाठी आर्थिक भार ठरू शकते. पुढील काळात सरकार या दरवाढीवर पुनर्विचार करते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.