अन्न व नागरी पुरवठा विभागाने या संदर्भात स्पष्टता दिली आहे. सरकारने आतापर्यंत ५ वेळा ई-केवायसीसाठी मुदतवाढ दिली आहे, पण आता 30 जून 2025 ही अंतिम मुदत असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही, असा स्पष्ट इशारा देण्यात आला आहे. जर तुम्ही या मुदतीत ई-केवायसी पूर्ण केली नाही, तर तुमचे रेशन कार्ड रद्द होऊ शकते आणि तुम्हाला स्वस्त धान्य मिळणे थांबू शकते.
advertisement
ई-केवायसी प्रक्रिया म्हणजे रेशन कार्डधारक आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांची ओळख त्यांच्या आधार क्रमांकाशी लिंक करणे. हे पाऊल फसवणूक, अपात्र लाभार्थी, मृत व्यक्तींच्या नावाने लाभ घेणे अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी अत्यंत आवश्यक आहे. रेशन वितरण व्यवस्था अधिक पारदर्शक आणि भ्रष्टाचारमुक्त बनवण्यासाठी सरकार ही मोहीम राबवत आहे. यापूर्वी ई-केवायसीसाठी ३१ मार्च ही अंतिम तारीख होती, परंतु अनेक लोकांना तांत्रिक अडचणी आणि अपुऱ्या माहितीमुळे नोंदणी करता आली नाही, म्हणून सरकारने ही मुदत वाढवून ३० जून केली आहे.
तुम्ही ई-केवायसी ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही पद्धतीने करू शकता:
ऑफलाइन ई-केवायसी: तुम्हाला ऑफलाइन केवायसी करायची असेल, तर तुमचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन तुमच्या जवळच्या रेशन केंद्रावर जा. तिथे रेशन केंद्रावर तुम्ही बायोमेट्रिक थंब (अंगठ्याचा ठसा) देऊन केवायसी पूर्ण करू शकता.
ऑनलाइन ई-केवायसी: ऑनलाइन केवायसीसाठी तुम्हाला 'Mera Ration' आणि 'Aadhaar Face RD' ही ॲप्स वापरावी लागतील. या ॲप्समध्ये तुम्हाला लॉगिन करायचे आहे. त्यानंतर, तुम्ही राहात असलेले राज्य, शहर आणि आधार क्रमांक अपलोड करून 'फेस आयडेंटिफिकेशन' (चेहरा ओळखणे) करायचे आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर तुमची केवायसी पूर्ण होईल.
या प्रक्रियेत एक महत्त्वाची बाब लक्षात ठेवावी लागेल. जर कुटुंबातील एका जरी सदस्याने ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करण्यास टाळाटाळ केली, तर त्या कुटुंबाचे संपूर्ण रेशन कार्ड रद्द होऊ शकते किंवा त्या सदस्याचे नाव वगळले जाऊ शकते. यामुळे तुम्हाला सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही आणि रेशन दुकानावर धान्यही मिळणार नाही. जर नाव वगळले गेले असेल, तर रेशन कार्डमध्ये नाव नोंदवण्यासाठी तुम्हाला पुन्हा नव्याने अर्ज प्रक्रिया करावी लागेल. त्यामुळे, तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी 30 जूनपर्यंत ई-केवायसी पूर्ण केली आहे की नाही, याची खात्री करून घ्या आणि भविष्यातील अडचणी टाळा!