येत्या २०२६ पर्यंत सोन्याचा भाव २ लाख रुपये प्रति 10 ग्रॅमपर्यंत पोहोचू शकतो, अशी शक्यता 'वर्ल्ड गोल्ड काउन्सिल'चे मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्हिड टेट यांनी व्यक्त केली आहे. एका न्यूज चॅनलशी बोलताना त्यांनी हे भाकीत खरं तर डिसेंबर 2025 मध्ये केलं होतं. त्यांचं हे भाकीत नव्या वर्षात खरं होताना दिसत आहे. सोन्याच्या दरांची वाटचाल अगदी सुस्साट चालली आहे.
advertisement
डेव्हिड टेट यांच्या मते, सध्या सुरू असलेली रशिया-युक्रेन संघर्ष, अमेरिका व्हेनिझुएला संघर्ष, याशिवाय व्यापारातील वाद ही सोन्याच्या दरवाढीची वरवरची कारणे आहेत. सोन्याच्या या ऐतिहासिक भरारीमागे वाढतं जागतिक कर्ज हे सर्वात मोठे आणि मुख्य कारण आहे. सरकारकडून होणारा वारेमाप खर्च आणि त्यामुळे येणारा आर्थिक ताण गुंतवणूकदारांना सोन्याकडे वळवत आहे.
१. चीनमधील शिथिल नियम: चीनमध्ये सोन्याच्या मागणीवरील निर्बंध कमी झाल्याने मागणी वाढेल.
२. चलनांचे मूल्य घटणे: जगभरातील प्रमुख चलनांची किंमत कमी होत आहे.
३. जागतिक तणाव: देशांमधील राजकीय वाद संपण्याचे नाव घेत नाहीत.
४. व्यापारातील तणाव: विविध देशांनी लादलेले टॅरिफ (कर) आणि व्यापारातील अटी.
५. अण्वस्त्र युद्धाची भीती: जगात वाढता आण्विक धोका.
६. आर्थिक अस्थिरता: जगभरातील देशांची बिघडलेली आर्थिक स्थिती.
डेव्हिड टेट यांनी अंदाज वर्तवला आहे की, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने ६,००० डॉलर प्रति औंस पर्यंत जाऊ शकते. भारतीय रुपयाच्या हिशोबात हा दर साधारण १,९२,८०० रुपये (सुमारे २ लाख) प्रति १० ग्रॅमच्या घरात जातो. जोपर्यंत जगावरील कर्जाचा डोंगर कमी होत नाही, तोपर्यंत सोन्याची ही घोडदौड थांबणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
केवळ सामान्य गुंतवणूकदारच नाही, तर जगातील विविध देशांच्या मध्यवर्ती बँका सुद्धा आपला सोन्याचा साठा वेगाने वाढवत आहेत. यामुळे सोन्याला एक भक्कम आधार मिळत असून, भविष्यात सोने खरेदी करणे सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाण्याची भीती व्यक्त होत आहे.
