सोन्याचा दर किती?
जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचा दर प्रति तोळा 98,160 रुपयांवर पोहोचला असून यामध्ये 700 रुपयांची झपाट्याने वाढ झाली आहे. जीएसटीसह ही किंमत आहे. गेल्या 8 दिवसांत सोन्याच्या दरात तब्बल 7,700 रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे.
सोन्याच्या दरात होत असलेल्या सततच्या चढ-उतारांमुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. विशेष म्हणजे, दररोज नवीन उच्चांक गाठत असलेल्या या दरांमुळे लग्नसराईच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांच्या खरेदीवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
advertisement
चांदीच्या दराने ओलांडला एक लाखाचा टप्पा...
फक्त सोनंच नव्हे, तर चांदीच्या दरातही मोठी उसळी पाहायला मिळत असून चांदीने पुन्हा एकदा 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला आहे. जागतिक घडामोडी, आंतरराष्ट्रीय बाजारातील अस्थिरता, अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची टॅरिफ धोरणे आणि अमेरिका-चीनमधील चालू असलेल्या व्यापारयुद्ध यांसारख्या घटनांचा सराफ बाजारावर स्पष्ट परिणाम होत आहे.
जळगावमध्ये सद्यस्थितीत सोन्याच्या दरात झालेली ही वाढ केवळ स्थानिक नव्हे, तर जागतिक आर्थिक परिस्थितीचे प्रतिबिंब मानली जात आहे. पुढील काही दिवसात दर आणखी वाढतील की स्थिर राहतील, याकडे गुंतवणूकदारांचे लक्ष लागून राहिले आहे.
ट्रम्पच्या घोषणेनंतर आंतरराष्ट्रीय बाजारात गोंधळ
2 एप्रिल रोजी ट्रम्प यांनी नव्या टॅरिफ धोरणाची घोषणा करताच आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी अस्थिरता निर्माण झाली. परिणामी, गुंतवणूकदारांनी जोखीम टाळण्यासाठी सोन्याकडे वळायला सुरुवात केली. शेअर बाजारातील चढउतार आणि डॉलरमध्ये झालेली हालचाल यामुळे सोन्याच्या दरांना झटका बसला आणि ते सातत्याने वाढू लागले.
