भारतीय बाजारपेठेत सोन्याच्या दराने आजपर्यंतचे सर्व विक्रम मोडीत काढले असून, किंमतींनी नवा उच्चांक गाठला आहे. आज (२९ जानेवारी २०२६) सोन्याच्या दरात झालेल्या प्रचंड दरवाढीने मध्यमवर्गीयांचे कंबरडे मोडले आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम १.७८ लाख ते १.८० लाख रुपयांच्या घरात पोहोचला असून, काही शहरांत तर या किंमतीने १.८१ लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
advertisement
मागील काही आठवड्यात सोन्याच्या दरात चांगलीच तेजी दिसून आली. जागतिक बाजारात सुरू असलेल्या उलथापालथीमुळे सुरक्षित गुंतवणुकीकडे ओढा वाढला आहे. त्याचा परिणाम भारतीय बाजारवरही पडला आहे.
>> ऐन लग्नसराईत मोठा फटका, खिशावरचा भार वाढला...
ऐन लग्नसराईत सोन्याच्या या 'झळा' बसत असल्यामुळे घराघरातील बजेट कोलमडले आहे. पूर्वी ५०-६० हजारांत मिळणाऱ्या तोळ्यासाठी आता पावणे दोन लाख मोजावे लागत आहेत. ५ तोळ्यांचे दागिने बनवण्यासाठी आता किमान ९ ते १० लाख रुपये मोजावे लागत आहेत.
वाढत्या किंमतींमुळे मध्यमवर्गीय आता जड दागिन्यांऐवजी 'लाईट वेट' (हलक्या वजनाच्या) दागिन्यांना पसंती देत आहेत. अनेक ठिकाणी सोन्याऐवजी चांदी किंवा इमिटेशन ज्वेलरीकडे ओढा वाढल्याचे ज्वेलर्स सांगत आहेत.
>> सोन्याच्या दरात वाढ का? एक्सपर्टनी सांगितली कारणे...
सोन्याच्या या भडक्यामागे प्रामुख्याने जागतिक आणि आर्थिक कारणे असल्याचे सांगितले जात आहे.
जागतिक तणाव:
आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढता तणाव आणि महागाईमुळे गुंतवणूकदार सोन्याला 'सुरक्षित पर्याय' मानत आहेत.
डॉलरची घसरण:
अमेरिकन डॉलर कमकुवत झाल्याने जागतिक बाजारपेठेत सोन्याच्या किंमती वधारल्या आहेत.
मध्यवर्ती बँकांची खरेदी:
विविध देशांच्या मध्यवर्ती बँका सातत्याने सोन्याचा साठा करत असल्याने मागणीत मोठी वाढ झाली आहे.
> सोन्याची मागणी घटली, सराफा बाजार थंडावला...
लग्नसराईच्या दिवसात मोठ्या प्रमाणावर सोन्याची खरेदी केली जात असे. मात्र, आता सामान्य ग्राहकांकडून कमी वजनाचे, कॅरेटचं सोनं खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. सोन्याच्या दरात तेजी आल्याने ग्राहकांकडून खरेदी थंडावली असल्याचे ज्वेलर्स व्यावसायिकांनी सांगितले.
"ग्राहकांनी खरेदीकडे पाठ फिरवली आहे. फक्त अत्यंत गरजेचे असलेले मंगळसूत्र किंवा लग्नाचे मोजकेच दागिने घेण्याकडे लोकांचा कल आहे. जुने सोने मोडून नवीन दागिने घेण्याचे प्रमाण वाढले आहे," असेही ज्वेलर्सने सांगितले.
