या वर्षाच्या सुरुवातीपासूनच सोन्याच्या दरात मोठी वाढ झाली आहे. विशेषतः सोन्याने सलग नऊ आठवडे तेजी नोंदवली आहे. 2025 मध्ये सोन्याच्या दरात जवळपास 65 टक्क्यांनी वाढ झाली आहे. जागतिक पातळीवरील अस्थिरता, काही देशांच्या मध्यवर्ती बँकांनी केलेली खरेदी, जागतिक तणाव अशा विविध कारणांमुळे सोन्याच्या दरात चांगलीच वाढ झाल्याचे दिसून आले.
मागील 24 तासाच्या अंतरात सोन्याच्या दरात तब्बल 4000 रुपयांनी वधारले आहे. सोन्याचा दर हा जीएसटीसह प्रति तोळा 1,35,000 रुपयांवर पोहोचला आहे. दुसरीकडे चांदीचे दर मात्र स्थिर राहिले आहेत.
advertisement
सोनं महागलं तरी ग्राहकांची गर्दी...
सोन्याचा दर झपाट्याने वाढत असतानाही मुहूर्त खरेदीसाठी सराफ दुकानांमध्ये ग्राहकांची मोठी गर्दी दिसत आहे. काहींनी अगोदरच ऑर्डर दिल्या, तर काही ग्राहक “किंमत आणखी वाढेल, म्हणून आजच घेऊन टाकू,” अशी भावना व्यक्त करताना दिसले. मात्र, भाववाढीमुळे अनेकांचं बजेट कोलमडलं आहे. एका ग्राहकाने सांगितलं, “गेल्या वर्षीच्या तुलनेत सोनं बरचं महागलं आहे. लग्न समारंभ आणि सणांच्या खर्चात अडचणी येत असल्याची खंत ग्राहकाने व्यक्त केली.
सराफ व्यापाऱ्यांच्या मते, आंतरराष्ट्रीय बाजारातील चढउतार, डॉलरच्या दरातील वाढ आणि वाढती मागणी यामुळे सोन्याच्या किमतींमध्ये वाढ होत आहे. तसेच, दुपारनंतर सोन्याच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचं सराफ व्यावसायिकांनी अंदाज व्यक्त केला आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त असल्याने भाव वाढले तरीही सुवर्ण खरेदी करण्याचा शुभ संकल्प कायम असल्याचं चित्र सराफ बाजारात पाहायला मिळत आहे.