नितीन नांदुरकर, प्रतिनिधी, जळगाव: गेल्या अनेक दिवसांपासून सोने व चांदीच्या भावात मोठी वाढ होत असताना आज पाडवा साणाच्या मुहूर्तावर सोनं-चांदीच्या दरात मोठी घट झाली आहे. लक्ष्मी पूजनाच्या दिनीदेखील सायंकाळच्या सत्रात सोनं स्वस्त झालं होतं. आता बारा तासात सोन्याच्या दरात मोठा उलटफेर झाला आहे.
advertisement
पाडव्याच्या शुभमुहूर्तावर सोन्याच्या बाजारात मोठी घसरण झाली असून, ग्राहकांसाठी ही दिलासादायक बातमी आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सतत वाढत असलेल्या सोन्या-चांदीच्या भावांमध्ये अचानक घसरण पाहायला मिळाली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षी सोन्याच्या दरात मोठ्या प्रमाणात वाढ झाली होती. गेल्या वर्षीचा दर सुमारे 80 हजार रुपयांवरून थेट 1 लाख 35 हजारांपर्यंत पोहोचल्याने ग्राहकांना जवळपास 55 हजार रुपयांची झळ लागली. तर, गुंतवणुकदारांना चांगलाच परतावा मिळाला.
सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण
सोन्याच्या दरात अवघ्या 12 तासांत तब्बल 6,200 इतकी घट झाली आहे. आजचा सोन्याचा दर (जीएसटीसह) 10 ग्रॅमसाठी 1,28,544 रुपये इतका नोंदवला गेला आहे.
चांदीच्या दरामध्ये देखील तब्बल 5,000 रुपयांची घसरण झाली आहे. जीएसटीसह चांदीचा दर प्रतिकिलो 1,64,800 रुपयांवर आला आहे.
जागतिक बाजारातील गुंतवणुकीचा परिणाम
जागतिक पातळीवर सोन्या आणि चांदीमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक वाढली. बाजारात उच्च खरेदी झाल्यानंतर नफा वसुली (Profit Booking) सुरू झाल्याने दरात घसरण झाली असल्याची माहिती बाजार तज्ञांनी दिली आहे.
ग्राहकांत उत्साहाचे वातावरण
दिवाळी पाडवा या शुभ दिवशी सोन्या-चांदीच्या दरांमध्ये झालेली घसरण ही ग्राहकांसाठी मोठी संधी मानली जात आहे. पारंपरिकरित्या या दिवशी सोनं खरेदी करण्याची प्रथा असल्याने बाजारात खरेदीचा उत्साह अधिक वाढण्याची शक्यता आहे.
लक्ष्मीपूजनाच्या आधीच दर घसरले...
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर आणि लक्ष्मीपूजनाला अवघे काही तास शिल्लक असतानाच जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्याच्या दरात अचानक घसरण झाली. सकाळी सोन्याचा दर प्रति तोळा 1 लाख 35 हजार रुपये इतका होता. मात्र केवळ तीन तासानंतरच दरात तब्बल 1500 रुपयांची घसरण झाली. सोन्याचा भाव 1 लाख 33 हजार 500 रुपये इतका खाली आला होता. त्यामुळे लक्ष्मीपूजनाच्या दिनी ग्राहकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.