मुंबई: हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडने (HUL) आपल्या काही सर्वाधिक लोकप्रिय उत्पादनांच्या किमती कमी केल्या आहेत. यामध्ये किसान जॅम, हॉर्लिक्स, लक्स साबण आणि डोव्ह शॅम्पू यांचा समावेश आहे. नवीन दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
advertisement
एका वृत्तपत्र जाहिरातीनुसार कंपनीने जाहीर केले आहे की- आता 340 मिली डोव्ह शॅम्पूची बाटली 490 रुपयांऐवजी 435 रुपयांना मिळेल. चार लाइफबॉय साबूंच्या (प्रत्येकी 75 ग्रॅम) पॅकची किंमत 68 रुपयांवरून 60 रुपयांवर आणली आहे. याशिवाय 200 ग्रॅम हॉर्लिक्सची किंमत 130 रुपयांवरून 110 रुपये, तर 200 ग्रॅम किसान जॅमची किंमत 90 रुपयांवरून 80 रुपये करण्यात आली आहे.
उत्पादनाचे नाव | जुनी किंमत (₹) | नवी किंमत (₹) | किंमत घट (%) |
---|---|---|---|
डोव्ह हेअर फॉल रेस्क्यू शॅम्पू (340 मिली) | 490 | 435 | 11.22% |
क्लिनिक प्लस स्ट्राँग अँड लॉंग शॅम्पू (355 मिली) | 393 | 340 | 13.49% |
सनसिल्क ब्लॅक शाईन शॅम्पू (350 मिली) | 430 | 370 | 13.95% |
डोव्ह सिरम बार (75 ग्रॅम) | 45 | 40 | 11.11% |
लाइफबॉय साबण (75 ग्रॅम × 4) | 68 | 60 | 11.76% |
लक्स रेडियंट ग्लो साबण (75 ग्रॅम × 4) | 96 | 85 | 11.46% |
क्लोजअप टूथपेस्ट (150 ग्रॅम) | 145 | 129 | 11.03% |
लॅक्मे 9 टू 5 पी-एम कॉम्पॅक्ट (9 ग्रॅम) | 675 | 599 | 11.26% |
किसान केचअप (850 ग्रॅम) | 100 | 93 | 7.00% |
किसान जॅम (200 ग्रॅम) | 90 | 80 | 11.11% |
हॉर्लिक्स चॉकलेट (200 ग्रॅम) | 130 | 110 | 15.38% |
हॉर्लिक्स विमेन्स प्लस (400 ग्रॅम) | 320 | 284 | 11.25% |
बूस्ट (200 ग्रॅम) | 124 | 110 | 11.29% |
ब्रू कॉफी (75 ग्रॅम) | 300 | 270 | 10.00% |
नॉर टोमॅटो सूप (67 ग्रॅम) | 65 | 55 | 15.38% |
हेलमन्स रियल मेयोनीज (250 ग्रॅम) | 99 | 90 | 9.09% |
सुधारित कमाल किरकोळ किमती (MRP) किंवा जास्त वजनाचे पॅक असलेली नवीन उत्पादने बाजारात पाठवली जात आहेत. किमतीतील बदलांविषयी ग्राहकांना माहिती देण्यासाठी कंपन्यांना एका किंवा अधिक वृत्तपत्रांमध्ये किमान दोन जाहिराती देणे, तसेच डीलर्स आणि राज्य व केंद्र सरकारमधील अधिकाऱ्यांना कळवणे बंधनकारक आहे.
सरकारच्या निर्देशानुसार ग्राहक वस्तू उत्पादकांनी ‘जीएसटी’ कपातीचा फायदा ग्राहकांना द्यावा, या पार्श्वभूमीवर एचयूएलने हे पाऊल उचलले आहे. 3 सप्टेंबर रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 56व्या ‘जीएसटी’ परिषदेच्या बैठकीत दैनंदिन वापरातील उत्पादने, शॅम्पू आणि हेअर ऑइलपासून ते ऑटोमोबाईल्स आणि टेलिव्हिजनपर्यंत अनेक वस्तूंवरील दर कमी करण्यात आले. परिषदेने ‘जीएसटी’ची रचनाही सोपी करून 5%, 18% आणि 40% अशा तीन टप्प्यांत विभागली आहे.
MRP बदलण्यास सरकारची परवानगी
सरकारने उत्पादक, पॅकर्स आणि आयातदारांना विकल्या न गेलेल्या जुन्या मालावर सुधारित कमाल किरकोळ किंमत (MRP) जाहीर करण्याची परवानगी दिली आहे. जेणेकरून ‘जीएसटी’ दरांमधील बदलांचा परिणाम किमतीवर दिसावा. या बदलांसाठी 31 डिसेंबर 2025 ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली आहे.
केंद्रीय अन्न आणि ग्राहक व्यवहार मंत्री प्रल्हाद जोशी यांनी ‘एक्स’ वर याबाबत माहिती देताना सांगितले की, नवीन ‘जीएसटी’ दरानुसार, उत्पादक, पॅकर्स आणि आयातदार 31 डिसेंबर 2025 पर्यंत (किंवा जुना साठा संपेपर्यंत) विकल्या न गेलेल्या मालावर ‘एमआरपी’मध्ये बदल करू शकतात. किमतीतील वाढ किंवा घट केवळ करातील बदलांनुसारच असावी. सुधारित ‘एमआरपी’ स्टिकर, स्टॅम्प किंवा ऑनलाइन प्रिंटद्वारे दर्शविण्यास परवानगी आहे, परंतु मूळ किंमतही स्पष्टपणे दिसावी, अशी अट ठेवण्यात आली आहे.