रक्सौलचे प्रसिद्ध व्यावसायिक मोहम्मद कलीम (Mohammad Kalim) यांच्या विविध ठिकाणांवर ही छापेमारी सुरू आहे, तपास यंत्रणांनी आपला फास अधिक घट्ट केला आहे. या ऐतिहासिक कारवाईचे आतापर्यंतचे सर्वात महत्त्वाचे अपडेट्स खालीलप्रमाणे आहेत.
शुक्रवारी पहाटे 6 वाजता सुरू झालेली ही कारवाई सुरुच आहे. मोहम्मद कलीम यांच्यासह त्यांचे सहकारी आणि चार्टर्ड अकाउंटंट (CA) यांच्या निवासस्थानी आयकर विभागाच्या टीमने तपासणीचा धडाका लावला आहे. एका महिला डायरेक्टर दर्जाच्या अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली ही संपूर्ण मोहीम अत्यंत गोपनीय पद्धतीने पार पाडली जात आहे.
advertisement
'ती' गुढ लाल डायरी आणि भोला गुप्ता
या छापेमारीत तपास यंत्रणांच्या हाती एक 'लाल डायरी' लागली असून, तिने कलीम यांच्या अडचणीत मोठी वाढ केली आहे. या डायरीमध्ये कलीम यांचे निकटवर्तीय भोला गुप्ता यांच्यासह अनेक बड्या व्यक्तींची नावे आणि आर्थिक व्यवहारांची नोंद आहे. याच डायरीतील माहितीच्या आधारे आयटी टीमने भोला गुप्ता यांच्या घरावरही छापा टाकला, जिथून अनेक महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत.
जप्त केलेली रोकड आणि 'नेपाळी' कनेक्शन
तपास यंत्रणांनी आतापर्यंत केलेल्या कारवाईत मोठी माया उघडकीस आणली आहे: आतापर्यंतच्या कारवाईत साधारणपणे 50 लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, जप्त केलेल्या रकमेमध्ये भारतीय रुपयांसोबतच नेपाळी करन्सीचाही मोठ्या प्रमाणावर समावेश आहे. यापूर्वीच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या रकमेत 2000 रुपयांच्या जुन्या नोटांचे बंडलही सापडल्याने तपास यंत्रणांच्या भुवया उंचावल्या आहेत.
लष्करी जवानांचा कडा पहारा
कारवाईचे गांभीर्य आणि सीमावर्ती भाग लक्षात घेता, स्थानिक पोलिसांऐवजी एसएसबी (SSB) या निमलष्करी दलाच्या 150 जवानांनी रक्सौलमध्ये मोर्चा सांभाळला आहे. कलीम यांची हिरो एजन्सी, तनिष्क शोरूम आणि इतर 5 प्रमुख ठिकाणांना जवानांनी वेढा घातला आहे, कोणालाही आत किंवा बाहेर जाण्यास मनाई आहे.
मोहम्मद कलीम यांच्या मालमत्तेशी संबंधित अनेक बेनामी व्यवहार आणि टॅक्स चोरीची मोठी साखळी यातून उघड होण्याची शक्यता आहे. जप्त केलेल्या कागदपत्रांची आणि लाल डायरीची सखोल चौकशी पूर्ण झाल्यानंतरच या 'महा-रेड'मध्ये नक्की किती कोटींचा भ्रष्टाचार झाला आहे, याचे अधिकृत आकडे समोर येतील.
