मुंबई: सध्याच्या काळात सायबर फसवणुकीच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. फसवे लोक बनावट कॉल आणि मेसेजद्वारे ग्राहकांकडून त्यांच्या बँकेची माहिती मिळवून खात्यातून पैसे गायब करत आहेत. या धोक्याची दखल घेत, देशातील सर्वात मोठ्या सरकारी बँक, भारतीय स्टेट बँक (SBI) ने आपल्या ग्राहकांसाठी एक विशेष अलर्ट जारी केला आहे. बँकेने ग्राहकांना अशा बनावट कॉल्सपासून वाचवण्यासाठी महत्त्वाची माहिती दिली आहे.
advertisement
बँकेने स्पष्ट केले आहे की, त्यांचे संपर्क केंद्र (Contact Centre) ग्राहकांशी फक्त 1600 किंवा 140 या सीरीजने सुरू होणाऱ्या क्रमांकांवरूनच संपर्क साधते. जर तुम्हाला कोणत्याही इतर क्रमांकावरून फोन आला आणि समोरची व्यक्ती स्वतःला एसबीआयचा कर्मचारी म्हणून सांगत असेल, तर लगेच सावध व्हा. कारण हा कॉल फसवणुकीचा भाग असू शकतो.
हा अलर्ट का महत्त्वाचा आहे?
आजकाल फसवणूक करणारे बँकेचे कर्मचारी असल्याचा बहाणा करून ग्राहकांकडून खाते क्रमांक, पासवर्ड, ओटीपी (OTP) आणि पिन यासारखी गोपनीय माहिती मिळवतात. या माहितीचा वापर करून ते लगेच बँक खात्यातून पैसे काढून घेतात. त्यामुळे, येणाऱ्या कॉलच्या क्रमांकाची ओळख पटवणे ही सुरक्षिततेची पहिली पायरी आहे.
फक्त याच क्रमांकांवरून येईल कॉल
एसबीआय संपर्क केंद्राकडून येणारे खरे कॉल फक्त 1600 किंवा 140 या सीरीजने सुरू होतात. याव्यतिरिक्त कोणत्याही क्रमांकावरून आलेल्या कॉल्सवर ताबडतोब संशय घ्या.
ग्राहकांनी काय करावे?
कोणत्याही अनोळखी क्रमांकावरून आलेल्या कॉलवर आपली कोणतीही बँकिंग माहिती शेअर करू नका.
ओटीपी, सीव्हीव्ही (CVV), एटीएम पिन यासारखी माहिती फोनवर कोणालाही सांगू नका.
जर तुम्हाला आलेला कॉल संशयास्पद वाटला तर लगेच तो कट करा आणि एसबीआयच्या जवळच्या शाखेशी किंवा हेल्पलाइनशी संपर्क साधा.
आरबीआयने जानेवारीमध्ये दिले होते निर्देश
भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) जानेवारीमध्ये सर्व बँका आणि संबंधित संस्थांना एक आदेश दिला होता. आरबीआयने सांगितले होते की, त्यांनी फक्त '1600xx' सीरीजच्या क्रमांकांवरूनच आर्थिक व्यवहार आणि सेवांशी संबंधित कॉल करावेत. एसबीआयचा हा अलर्ट आरबीआयच्या याच निर्देशांवर आधारित आहे.