पण, ट्रेन प्रवास म्हटलं की एक मोठा प्रश्न नेहमी डोळ्यासमोर येतो तो म्हणजे ट्रेनचं तिकीट कन्फर्म होणार की वेटिंगमध्ये अडकणार? विशेषतः जेव्हा आपण एकत्र कुटुंबात 5-6 जणांसाठी बुकिंग करतो, तेव्हा हा प्रश्न आणखी गुंतागुंतीचा होतो.
कल्पना करा, तुम्ही 6 लोकांचे ऑनलाइन तिकीट काढले, त्यापैकी 3 कन्फर्म झाले आणि 3 अजूनही वेटिंग लिस्टमध्ये आहेत. आता प्रश्न असा उभा राहतो की वेटिंग लिस्टवर असलेले लोक ट्रेनमध्ये चढू शकतात का? टीटीई त्यांना गाडीतून उतरवेल का? की दंड भरावा लागेल?
advertisement
जेव्हा तुम्ही ऑनलाइन एकाच बुकिंगमध्ये अनेक तिकीट काढता, तेव्हा एक PNR (Passenger Name Record) नंबर तयार होतो. हा नंबर त्या तिकीटावरील प्रवाशांची, ट्रेनची, सीट नंबरची सगळी माहिती ठेवतो. एका PNR वर जास्तीत जास्त 6 तिकीट बुक करता येतात.
पूर्वी असं होतं की, जर एकाच PNR वर काही तिकीट कन्फर्म आणि काही वेटिंगमध्ये असतील, तर सगळे प्रवासी ट्रेनमध्ये चढू शकत होते. जरी वेटिंग लिस्टवाल्यांना सीट मिळत नसे, तरी त्यांना प्रवासाची परवानगी होती.
मात्र, आता रेल्वेने नियम स्पष्ट केले आहेत. फक्त कन्फर्म तिकीट असलेले प्रवासीच Sleeper किंवा AC कोचमध्ये प्रवास करू शकतात. वेटिंग लिस्ट तिकीट चार्ट तयार झाल्यानंतरही कन्फर्म न झाल्यास तो प्रवासी त्या कोचमध्ये चढू शकत नाही.
मग ६ तिकीटांपैकी ३ कन्फर्म आणि ३ वेटिंग असतील तर काय करायचं?
कन्फर्म तिकीटवाल्यांना प्रवासाची पूर्ण परवानगी आहे. त्यात RAC (Reservation Against Cancellation) झाल्यास तुम्ही प्रवास करू शकता, पण एका बर्थवर दोन लोकांना बसून प्रवास करावा लागेल. चार्टनंतरही वेटिंग असल्यास, अशा तिकीटावर कोचमध्ये चढणे नियमबाह्य आहे. जर कोणी जबरदस्तीने चढलं, तर टीटीई त्यांना दंड ठोठावू शकतो किंवा उतरवू शकतो.
अशा वेळी प्रवाशांनी जनरल तिकीट स्टेशनवरून किंवा UTS अॅपवरून काढून प्रवास करावा.
IRCTC काय करतं वेटिंग तिकीटांचं?
जर तुम्ही ऑनलाइन तिकीट बुक केलं आणि चार्टनंतरही ते वेटिंगमध्येच राहिलं, तर IRCTC ते तिकीट आपोआप रद्द करतं. यामुळे प्रवाशांचे पैसे परत मिळतात. प्रवाशाला स्वतंत्रपणे तिकीट रद्द करण्याची गरज नसते.
एकंदरीत सांगायचं तर, आता रेल्वेचे नियम कठोर झाले आहेत. कन्फर्म तिकीटवाल्यांना प्रवासाची मुभा आहे, पण वेटिंग लिस्टवाल्यांनी पर्यायी व्यवस्था (RAC किंवा जनरल तिकीट) करायलाच हवी, नाहीतर प्रवासात अडचणी येऊ शकतात.