मुंबईतल्या व्यावसायिकांना ईडीचा धाक दाखवून 164 कोटी रुपयांची खंडणी वसूल केल्याप्रकणी गेल्या महिन्यात पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली. त्या आरोपींची पोलिसांनी कसून चौकशी केली आहे. त्यापैकीच एक हिरेन भगत हा आरोपी आहे. पावणे दहा कोटी रुपयांच्या आणखी एका खंडणीप्रकरणात वांद्रे क्राइम ब्रँच पोलिसांनी त्याला तुरुंगातून ताब्यात घेतलं आहे. हिरेन याला शुक्रवारी न्यायालयासमोर सादर करण्यात आलं. महानगर दंडाधिकाऱ्यांनी त्याला सहा दिवसांची गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.
advertisement
या नव्या केसमधील तक्रारदार 92 वर्षांचे आहेत. ते एका नामांकित ग्रुप ऑफ हॉटेलमध्ये व्यवस्थापकिय संचालक म्हणून कार्यरत होते. 1997 मध्ये ते निवृत्त झाले. त्यानंतर ते अनेक वेगवेगळ्या पदांवर कार्यरत होते. सध्या ते एका पर्यटन कंपनीसोबत काम करत आहेत. त्यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. त्यात म्हटलंय, की 2020 मध्ये जेव्हा त्यांच्या मुलाविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगबाबत चौकशी सुरू होती, तेव्हा ते हिरेनला भेटले.
मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या एका एफआयआरवर ईडीची केस आधारित होती. त्यात असा आरोप करण्यात आला होता, की तक्रारदाराच्या पर्यटन कंपनीने बँकेकडून घेतलेल्या 3642 कोटी रुपयांच्या कर्जाची परतफेड करण्यात फसवणूक केली.
तक्रारदाराच्या मुलाला अटक होण्यापासून वाचवण्यासाठी मदत करण्याचं वचन हिरेननं तक्रारदाराला दिलं होतं. त्याबदल्यात त्यानं तक्रारदाराकडून थोड्या थोड्या दिवसांच्या फरकानं पावणे दहा कोटी रुपये उकळले. ईडीने नंतर तक्रारदाराच्या मुलाला अटक केली. मुलाला अटक झाल्यानंतरही पिस्तुलाचा धाक दाखवून हिरेन तक्रारदाराकडून पैसे उकळत असल्याचा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आलाय.
तक्रारदाराच्या मुलाचं आयुष्य जेलमध्ये उद्ध्वस्त करू अशी धमकी आरोपीनं दिल्याचं गुन्हे शाखेनं बुधवारी (14 फेब्रुवारी) फोर्ट येथील न्यायालयात सांगितलं. आरोपीनं खंडणीमध्ये पैशांव्यतिरिक्त एक महागडं घड्याळही तक्रारदाराकडून वसूल केलं होतं. आरोपीकडून पिस्तुल आणि खंडणीपोटी उकळलेली रक्कम वसूल करण्याकरता वांद्रे गुन्हे शाखेनं शुक्रवारी (16 फेब्रुवारी) त्याचा ताबा मागितला. न्यायालयानं 21 फेब्रुवारीपर्यंत त्याला गुन्हे शाखेच्या ताब्यात दिलं आहे.
व्यावसायिकांकडून 164 कोटी रुपयांची खंडणी मागितल्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत सहा जणांना अटक केली आहे. त्यांच्या चौकशीमधून आणखीही काही माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
