मिळालेल्या माहितीनुसार, दीपेश नाईक हा अर्नाळा बंदरपाडा येथील रहिवासी असून सध्या मुंबईतील एका इन्स्टिट्यूटमध्ये सिक्युरिटी गार्ड म्हणून कार्यरत होता. तो ऑनलाइन गेमिंगच्या नशेत एवढा बुडाला होता की मोठी आर्थिक हानी झाली. गेम खेळताना झालेल्या तोट्याची भरपाई करण्यासाठी त्याने अनेकांकडून उसने पैसे घेतले. मात्र परतफेडीचा तगादा वाढत चालल्याने दीपेशवर मानसिक ताण वाढला आणि त्याने चोरीचा मार्ग स्वीकारण्याचा निर्णय घेतला.
advertisement
याच हेतूने तो काही दिवसांपूर्वी गोवारी कुटुंबाच्या घरात चोरीसाठी शिरला. परंतु चोरीच्या प्रयत्नादरम्यान घरातील सदस्यांनी प्रतिकार केला. अचानक उघडकीस आल्यानंतर घाबरलेल्या दीपेशने संतापाच्या भरात घरातील सदस्यांवर चाकूने वार केले. या घटनेत कुटुंबातील काही सदस्य गंभीर जखमी झाले असून परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी दीपेश मुंबईला फरार झाला. मात्र गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक तपास, सीसीटीव्ही फूटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे त्याचा ठावठिकाणा शोधला. बुधवारी सकाळी मुंबईतील एका ठिकाणी नाट्यमय कारवाई करून पोलिसांनी त्याला अटक केली.
ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा वाढता धोका पुन्हा एकदा चर्चेत
तपासादरम्यान उघड झाले की दीपेश हा ऑनलाइन गेमच्या व्यसनात गुंतून स्वतःचे आयुष्य उद्ध्वस्त करत होता. कर्जाच्या तगाद्याने आणि गेमच्या नशेने त्याचे आयुष्य अंधकारात ढकलले. पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ऑनलाइन गेमिंगच्या व्यसनाचा वाढता धोका पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.