रेल्वे स्थानकांबाहेर पादचाऱ्यांची फरपट
उरण-नेरुळ-बेलापूर लोकल मार्गावरील न्हावाशेवा रेल्वे स्थानकाच्या पश्चिम बाजूने जाणाऱ्या या रस्त्यावरून दररोज प्रवासी, कामगार, विद्यार्थी प्रवास करतात. सिडकोच्या द्रोणागिरी नोडमधील काही भागात रस्त्याची दुरुस्ती करण्यात आली असली तरी बाकीचा भाग अजूनही पूर्णपणे खड्डेमय आहे. पावसाळ्यात या खड्ड्यांत पाणी साचत असल्याने अपघात होण्याची भीती वाढली आहे.
उरण ते नेरुळ आणि बेलापूरदरम्यान लोकल सेवा सुरू झाल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. या लोकल सेवेला आता दोन वर्षे पूर्ण झाली असून प्रवासी संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. मात्र स्थानकांशी जोडणारे रस्ते आणि ये-जा करण्यासाठी आवश्यक सुविधा अपुऱ्या आहेत. अनेक ठिकाणी प्रवाशांना सुरक्षित मार्गच उपलब्ध नाहीत.
advertisement
न्हावाशेवा रेल्वे स्थानक महत्त्वाचे स्थानक असून या ठिकाणाहून जेएनपीए बंदर, औद्योगिक परिसर आणि वसाहतींना जोडणारी वाहतूक होते. खराब रस्त्यामुळे रिक्षा, खासगी वाहन आणि दुचाकी चालकांना मोठ्या अडचणी येत आहेत. त्यामुळे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन हा रस्ता दुरुस्त करावा आणि तो वाहतुकीयोग्य करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
