पावसाळ्यानंतर समुद्रातील कामांना गती
महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) पावसाळ्यानंतर समुद्रातील कामांना पुन्हा सुरुवात केली आहे. वर्सोवा, जुहू, कार्टर रोड आणि वांद्रे या चारही दिशांनी सध्या मोठ्या प्रमाणावर सागरी काम सुरू आहे. पावसाळ्यादरम्यान सुरक्षा कारणास्तव समुद्रातील काम थांबवण्यात आले होते. मात्र त्याच काळात वर्सोवा, कार्टर रोड आणि जुहू बाजूच्या कनेक्टरचे जमिनीवरील बांधकाम सुरू ठेवण्यात आले, ज्यामुळे प्रगती कायम ठेवण्यात आली.
advertisement
प्रकल्पाचा आकार आणि वैशिष्ट्ये
एमएसआरडीसीच्या माहितीनुसार, वांद्रे-वर्सोवा सी लिंकची एकूण लांबी 17.7 किलोमीटर असून त्यातील मुख्य सागरी सेतू 9.60 किलोमीटर लांबीचा असेल. हा सेतू सुमारे 900 मीटर समुद्राच्या आत बांधला जाणार आहे आणि एकूण आठ मार्गिका (लेन) असतील. या सी लिंकच्या माध्यमातून वांद्रे-वरळी सी लिंकवरील ताण कमी होणार असून वर्सोवा, जुहू, सांताक्रूझ आणि बांद्रा परिसरांतील प्रवास वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल.
25 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण
सध्या या प्रकल्पाचे सुमारे 25 टक्क्यांहून अधिक काम पूर्ण झाले आहे. समुद्रात अवजड साहित्य उतरविण्याचे आणि पायाभूत रचना उभारणीचे काम सुरू असून, अधिकारी सांगतात की आता कामांना अपेक्षित गती मिळत आहे. वांद्रे-वर्सोवा सी लिंकचे काम 2019 मध्ये सुरू झाले होते. त्या वेळी हा प्रकल्प ऑगस्ट 2025 पर्यंत पूर्ण होईल, असा अंदाज वर्तवण्यात आला होता. मात्र कोविड-19 काळात लागू झालेली टाळेबंदी, कामगारांची अनुपलब्धता आणि कंत्राटदारांच्या आर्थिक अडचणींमुळे काम रखडले. या विलंबामुळे प्रकल्पाची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून आता हा प्रकल्प मे 2028 पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे.
18, 120 कोटी रुपयांचा भव्य प्रकल्प या प्रकल्पाचा एकूण खर्च तब्बल 18,120 कोटी रुपये एवढा आहे. हा मुंबईतील सर्वात महागडा सागरी पूल ठरणार आहे. या सी लिंकच्या बांधकामासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून समुद्रातील प्रबल वारे आणि भरती-ओहोटीचा दबाव सहन करणारी मजबूत रचना तयार केली जात आहे.
हा पूल सुरू झाल्यानंतर पश्चिम उपनगरातून दक्षिण मुंबईकडे जाणाऱ्या वाहनचालकांना मोठा दिलासा मिळेल. सध्या अंधेरी, जुहू आणि वांद्रे परिसरातील रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी हा पूल अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. तसेच हा पूल वांद्रे-वर्ली सी लिंकशी जोडला जाणार असल्याने मुंबईच्या किनाऱ्यावरील सागरी महामार्ग नेटवर्क अधिक सक्षम आणि सुसंगत होणार आहे.
