प्रवाशांना दिलासा देणारा निर्णय!
बेलापूर-नेरुळ-उरण विभागात 10 अतिरिक्त जोड्या लोकल रेल्वे सेवा सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे उरण मार्गावरील लोकल सेवांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार असून दैनंदिन प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. एवढेच नाही तर उरण रेल्वे मार्गावरील दोन तरघर आणि गावन ही स्थानके प्रवाशांसाठी सुरु होणार आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या अगदी जवळ असलेले तरघर स्थानक भविष्यात अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. विशेष म्हणजे विमानतळाकडे जाणाऱ्या प्रवाशांसाठी हे स्थानक सोयीचे ठरेल तसेच परिसरातील नागरिकांना थेट उपनगरीय रेल्वेचा लाभ मिळेल. दुसरीकडे गावन स्थानक सुरू झाल्यामुळे उरण परिसरातील रेल्वे कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होणार आहे.
advertisement
लोकलच्या वेळा कशा असतील?
नवीन विस्तारित वेळापत्रकानुसार उरण येथून पहिली लोकल सकाळी 5.35 वाजता सुटेल तर शेवटची लोकल रात्री 10.05 वाजता निघेल आणि बेलापूरहून लोकल सेवा सकाळी 5.45 ते रात्री 10.15 या वेळेत उपलब्ध असतील तसेच नेरुळहून सकाळी 6.05 वाजल्यापासून रात्री 9.30 वाजेपर्यंत लोकल सेवा सुरू राहतील. या सुधारित वेळापत्रकामुळे प्रवाशांना सकाळी आणि संध्याकाळच्या पीक अवर्समध्येही अधिक पर्याय मिळणार आहेत.
या नव्या सेवांमुळे उरण लाईनवरील एकूण लोकल सेवांची संख्या 40 वरून थेट 50 इतकी होणार आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल, प्रवास अधिक सुलभ होईल आणि वेळेची बचत होईल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना आवाहन केले आहे की त्यांनी नवीन वेळापत्रकाची माहिती करून घेऊन त्यानुसार आपल्या प्रवासाचे नियोजन करावे. उरण रेल कॉरिडोरवरील हा बदल नवी मुंबईच्या विकासाला गती देणारा ठरणार आहे.
