महायुतीमधील 'बार्गेनिंग'मध्ये शिवसेनेने बाजी मारली असून, या तिन्ही महापालिकांमध्ये शिवसेनेचाच महापौर पाच वर्षांसाठी राहणार आहे. बदल्यात भाजपने उपमहापौरपद आणि काही महत्त्वाच्या समित्या आपल्याकडेच ठेवल्या आहेत. त्यामुळे महत्त्वाचे डिपार्टमेंट आता भाजपकडे राहणार असल्याचं दिसत आहे.
सत्तेचा नवा फॉर्म्युला काय?
नुकत्याच झालेल्या महानगरपालिका निवडणुकांच्या निकालानंतर भाजप आणि शिवसेना दोन्ही पक्षांनी महापौरपदावर दावा ठोकला होता. मात्र, ठाणे हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने आणि कल्याण-डोंबिवलीतही शिवसेनेने चांगली कामगिरी केल्याने हा सन्मान शिवसेनेला देण्यात आला आहे. ठाणे, केडीएमसी, उल्हासनगर: या तिन्ही शहरांत महापौर शिवसेनेचा असेल. भाजपचा वाटा तिन्ही ठिकाणी उपमहापौरपद भाजपला देण्यात आले आहे.
advertisement
केडीएमसीमध्ये राहुल दामलेंची वर्णी
कल्याण-डोंबिवली महापालिकेत भाजपने आपले पत्ते उघडले असून, ज्येष्ठ नगरसेवक राहुल दामले यांचे नाव उपमहापौरपदासाठी जाहीर करण्यात आल्याची खात्रीशीर माहिती आहे. दामले यांचा दांडगा अनुभव आणि भाजपमधील त्यांची पकड लक्षात घेता, पक्षाने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे.
राजकीय हालचालींना पूर्णविराम?
मुंबई महानगरपालिकेत भाजपला झुकते माप दिल्यानंतर, ठाणे जिल्ह्याची सूत्रे शिवसेनेकडेच राहावीत, असा आग्रह एकनाथ शिंदे यांनी धरला होता. मुख्यमंत्री फडणवीस यांनीही 'मोठ्या भावाची' भूमिका घेत हा प्रस्ताव मान्य केल्याचे बोलले जात आहे. या निर्णयामुळे गेल्या काही दिवसांपासून दोन्ही पक्षांतील कार्यकर्त्यांमध्ये सुरू असलेला कलगीतुरा आता थांबण्याची शक्यता आहे.
