मुंबई महापालिकेमध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला 65, काँग्रेसला 25, एमआयएमला 8, मनसेला 6, अजित पवारांच्या राष्ट्रवादीला 3, समाजवादी पक्षाला 2 आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेवर विजय मिळाला आहे. एमआयएमला मुंबईमध्ये मनसे, दोन्ही राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्षापेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. तसंच महाराष्ट्रामध्येही एमआयएमचे 125 पेक्षा जास्त नगरसेवक निवडून आले आहेत, त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
advertisement
मुंबईत एमआयएम भाजपला पाठिंबा देणार?
एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना महाराष्ट्रातल्या या कामगिरीबद्दल तसंच मुंबई महापौर निवडीमध्ये भाजपला पाठिंबा देणार का? असा प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा ओवेसींनी थेट उत्तर दिलं आहे. एमआयएम मुंबईमध्ये महापौर निवडीच्या वेळी भाजपला पाठिंबा देणार का? असा विचारताच ओवेसींनी प्रश्नच उद्भवत नाही, असं उत्तर दिलं आहे.
महाराष्ट्रामधल्याच अकोटमध्ये एमआयएमच्या तिकिटावर निवडून आलेल्या 5 नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याचा प्रश्नही ओवेसींना विचारण्यात आला, तेव्हा हा शिस्तभंगाचा गंभीर मुद्दा आहे. आम्ही नगरसेवकांना आधीच कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. अमरावतीमध्ये भेट झाली तेव्हाही मी नगरसेवकांना स्पष्ट इशारा दिला आहे, कोणताही नितीगत निर्णय लोकप्रतिनिधी नाही, तर पक्ष घेईल. पण तरीही नगरसेवकांनी भाजपला पाठिंबा दिला, यानंतर त्यांना राज्यातल्या अध्यक्षांनी तातडीने निलंबित केलं, असं ओवेसी म्हणाले आहेत.
एमआयएम भाजप किंवा एनडीएसोबत कोणत्याही परिस्थितीमध्ये जाऊ शकत नाही. पक्षातला कोणताही लोकप्रतिनिधी स्वतंत्र किंवा वैयक्तिक निर्णय घेऊ शकत नाही, असा इशाराही ओवेसी यांनी दिला आहे. तसंच ओवेसींनी महाराष्ट्रात एमआयएमला मिळालेल्या यशाबद्दल पक्षाचे कार्यकर्ते, उमेदवार, मतदार आणि एमआयएम महाराष्ट्र अध्यक्ष इम्तियाज जलिल यांचेही आभार मानले आहेत. एमआयएमला मिळालेल्या जनादेशावर प्रश्न उपस्थित करणं, हा जनतेच्या निर्णयाचा अपमान आहे, अशी प्रतिक्रिया ओवेसींनी दिली.
पश्चिम महाराष्ट्रात प्रचार करू न शकल्याबद्दल ओवेसींनी नाराजी व्यक्त केली. पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रचाराला वेळ मिळाला असता तर एमआयएम आणखी चांगली कामगिरी करू शकली असती, अशी खंतही ओवेसींनी व्यक्त केली आहे.
