मुलगा असूनही लावणी करायला लाज वाटत नाही का? अशा टोमण्यांचा आणि अपमानाचा किरण यांना सामना करावा लागला. मात्र, अडचणी आणि टीका यांना न जुमानता त्यांनी आपली कला जपली आणि त्याच कलेने त्यांना महाराष्ट्राचा लावणी सम्राट म्हणून ओळख दिली. त्यांच्या या प्रवासाविषयी त्यांनी लोकल 18 ला माहिती दिली.
मूळचे नांदेड जिल्ह्यातील छोट्याशा डोणगावातील असणारे किरण यांनी बीएससी, बीएड, एअरपोर्ट मॅनेजमेंटचं शिक्षण घेतलं आहे. किरण कोरे यांना लहानपणापासूनच डान्सची आवड होती. ते टीव्हीवर येणारे लावणीचे कार्यक्रम बघून त्यांनी नृत्याचे धडे गिरवले. वयाच्या अवघ्या 11 व्या वर्षी त्यांनी पहिल्यांदा लावणी सादर केली. एक मुलगा साडी नेसून लावणी करतो म्हणून त्यांना हिजडा, बाईला अशा टोमण्यांचा सामना करावा लागला. या अपमानाला सामोरे जात त्यांनी आपली कला जपली. याच कलेमुळे त्यांना महाराष्ट्राचा लावणी सम्राट म्हणून ओळख मिळाली आहे.
advertisement
आई-वडिलांच्या निधनानंतर किरण कोरे यांनी लावणीला प्रोफेशन म्हणून स्वीकारलं. सुरुवातीला भावकीतील आणि परिसरातील लोक त्यांना टोमणे मारायचे. बायकांसारखी साडी नेसून कशाला नाचतोस? असे शब्द त्यांना ऐकावे लागले. तरीही त्यांनी हार न मानता मेहनत सुरू ठेवली आणि स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. आज तेच लोक अभिमानाने त्यांना लावणी सम्राट म्हणतात. किरण कोरे हे उत्तम मेकअप आर्टिस्ट देखील आहेत. त्यांना लावणीसाठी 400 हून अधिक पुरस्कार मिळाले आहेत, तसेच फोक डान्ससाठी श्रीलंका आणि थायलंड येथे दोन वेळा आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल मिळालं आहे.





