धुरंधर बनायला गेले अन् जोरदार आपटले, पुण्यात 4 शहराध्यक्षांचा दारुण पराभव
- Published by:Ravindra Mane
Last Updated:
पुणे महानगर पालिका निवडणुकीत सहा मुख्य राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरले होते. मात्र, या 'हाय-प्रोफाईल' लढतींमध्ये मतदारांनी धक्कादायक कौल दिला आहे.
अभिजीत पोते, प्रतिनिधी पुणे: शुक्रवारी पुणे महानगरपालिका निवडणुकीचा निकाल लागला. या निवडणुकीत भाजपनं जोरदार मुसंडी मारत १२० जागांवर विजय मिळवला आहे. इथं भाजपनं विजय खेचून आणला असला तरी इथं अनेक धक्कादायक निकाल बघायला मिळाले. पुण्यात अजित पवार गटाला सपशेल अपयश मिळालं आहे. तसेच इतरही दिग्गजांना इथं पराभवाचा सामना करावा लागला आहे.
पुणे महानगर पालिका निवडणुकीत सहा मुख्य राजकीय पक्षांचे शहराध्यक्ष रिंगणात उतरले होते. मात्र, या 'हाय-प्रोफाईल' लढतींमध्ये मतदारांनी धक्कादायक निकाल दिले असून, चक्क चार बड्या पक्षांच्या शहराध्यक्षांना पराभवाचा धूळ चारली आहे. केवळ भाजप आणि काँग्रेसचे शहराध्यक्षच निवडून येण्यात यशस्वी ठरले आहेत.
दोघांचा विजय, चौघांना दणका
भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी आपल्या प्रभागातून विजय मिळवत पक्षाचा गड राखला आहे. त्याच बरोबर काँग्रेसचे अनुभवी नेते आणि शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांनीही विजय संपादन केला असून पुण्यात काँग्रेसची ताकद दाखवून दिली आहे. दुसरीकडे, ठाकरे गटाचे शहराध्यक्ष संजय मोरे, पुण्यातील मनसेचा आक्रमक चेहरा आणि शहराध्यक्ष साईनाथ बाबर, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष नाना भानगिरे यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.
advertisement
पुणे महानगरपालिकेचा निकाल काय लागला?
पुण्यात भाजप सर्वात मोठा भाऊ ठरला आहे. १६५ पैकी १२० जागांवर भाजपनं विजय संपादन केला असून एकहाती वर्चस्व निर्माण झालं आहे. दुसऱ्या क्रमांकावर अजित पवारांचा पक्ष असून अजित पवारांना २९ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला तिसऱ्या क्रमांच्या १५ जागा मिळाल्या आहेत. तर शिवसेना ठाकरे गटला अवघ्या एका जागेवर समाधान मानावं लागलं आहे. पुण्यात मनसे आणि शिंदे गटाला एकही जागा मिळवता आली नाही.
मुंबई आणि पुण्यासह महाराष्ट्रातील महानगरपालिका निवडणुकीचे निकाल पाहण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या निवडणूक बातम्या तसेच अपडेट्सची यादी मिळवा.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
Jan 17, 2026 2:05 PM IST








