एलपीजी सिलिंडरच्या तुटवड्यामुळे मुंबईत नाश्त्यांच्या किंमतीत लक्षणीय वाढ झालेली आहे. मुंबईमध्ये पोटाची खळगी भरण्यासाठी प्रत्येकजण महागाईचा सामना करत आहे. फूड स्टॉल चालकांनी माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेत ते म्हणाले की, "LPG च्या तुटवड्यामुळे आम्हाला रॉकेल किंवा कोळशावर चालणाऱ्या शेगडींचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे आमच्या खर्चांमध्ये आणखीनच वाढ झाली आहे. पूर्वी एक डोसा आम्ही 25 रूपयांना विकायचो, तोच डोसा आता आम्ही 30 रूपयांना विकतोय. तर 30 रूपयांचा डोसा आम्ही 35 रूपयांना विकत आहोत. सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे किंवा गॅस एजन्सीकडून महाग विकत जात असल्यामुळे त्या किंमती आम्हाला परवडत नाहीत. अनेक दुकानदारांनी रॉकेलच्या शेगड्या वापरायला सुरुवात केली आहे."
advertisement
मिडिया रिपोर्टनुसार, "पूर्वी 1700 रूपयांना विकला जाणारा गॅस सिलिंडर सध्याच्या काळात ब्लॅकमध्ये 5000 ते 6000 ला विकला जात आहे. नाश्त्यांच्या आणि जेवणाच्या किंमतींमध्ये वाढ झाल्यामुळे फुड स्टॉलवर ग्राहकांची गर्दी आता कमी होऊ लागली आहे. जर हा तुटवडा कायम राहिला तर अन्नधान्याच्या किंमतीही आणखी वाढू शकण्याची शक्यता आहे." हे संकट केवळ मुंबईपुरते मर्यादित नसून ठाण्यात एलपीजी सिलिंडरच्या कमतरतेमुळे जवळपास 60 टक्के हॉटेल्स बंद पडल्याची माहिती आहे. अनेक खानावळींमध्ये आणि हॉटेल्समध्ये चुलींचा वापर केला जात आहे. कोळसा किंवा लाकडाचा वापर करून चूल पेटवली जात आहे. गॅस सिलिंडरच्या किंमतींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाल्यामुळे हॉटेल आणि खानावळ मालकांनी चूलीचा पर्याय निवडला आहे. यामुळे त्यांना स्वयंपाक करणं एक डोकेदुखी झाली.
हॉटेल आणि खानावळ मालकांनी सरकारकडे नियमित गॅस पुरवठा केला जावा याचे आवाहन केले आहे. शिवाय, सिलिंडरच्या वाढत्या काळ्या बाजाराबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली आहे. व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किंमतीमुळे सर्वांचीच चांगलीच तारांबळ उडाली आहे. हा मुद्दा फक्त एकट्या मुंबई किंवा ठाणे शहरापुरती मर्यादित नसून संपूर्ण देशभरात गॅस सिलिंडरचा मुद्दा चर्चेचा विषय ठरला आहे.
